Video: दादर-CSMT प्रवासात दिसणाऱ्या 'या' घराचं महिन्याचं भाडं 40 लाख रुपये! घराची किंमत...

Mumbai Real Estate News: या घरामधील सुविधांची यादी पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या घराची किंमत पाहून अनेकांना बसलाय धक्का.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 21, 2024, 03:32 PM IST
Video: दादर-CSMT प्रवासात दिसणाऱ्या 'या' घराचं महिन्याचं भाडं 40 लाख रुपये! घराची किंमत... title=
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय

Mumbai Real Estate News: मुंबईमध्ये सर्वसामान्यांना घरं घेणं म्हणजे दिवास्वप्न झालं आहे असं म्हटलं जातं. यामागील मुख्य कारण म्हणजे मुंबईत रिअल इस्टेट सेक्टरमधील प्रापर्टीचे दर! मुंबईमध्ये वन बीएचके घर घेण्यासाठीही कोट्यवधी रुपये मोजावे लागतील अशी स्थिती आहे. तर दुसरीकडे मायानगरी मुंबईमध्ये शेकडो कोटींच्या घरांचेही व्यवहार होताना दिसतात. सर्वसामान्यांना आकडेवारीचा विचारही करता येणार नाही एवढी महाग घरंही मुंबईत आहे. केवळ खरेदी-विक्री नाही तर काही आलिशान घरं अशी आहेत की ज्यांच्या एका मासिक भाड्यामध्ये कल्याण, बदलापूरसारख्या ठिकाणी एखादा वन बीएचके किंवा वन आरके रुम खरेदी करता येईल. अशाच एका आलीशान घराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विशेष म्हणजे हा व्हिडीओ अशा ठिकाणावरील इमारतीचा आहे की जी दादर ते सीएसएमटी प्रवास करणाऱ्याला प्रत्येकाला दिसतेच.

कोणी शेअर केला आहे व्हिडीओ?

सोशल मीडियाच्या माध्यमातून घरांची विक्री करणारे अनेक एजंट हल्ली सहज स्क्रोलिंग करताना दिसून येतात. अशाच एका एजंटपैकी आहे रवी कवलरमाणी! हा एजंट केवळ महागड्या आणि आलिशान घरांचीच विक्री करतो. प्रामुख्याने दक्षिण मुंबईसहीत वांद्रे, वरळीसारख्या ठिकाणी असलेल्या प्रिमिअम प्रोजेक्टमध्ये घरं विकणाऱ्या रवीने नुकतीच एका घराच्या विक्रीसाठीचा तसेच भाडेतत्वावर देण्यासाठीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या घराची किंमत आणि त्याचं मासिक भाडं सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

घरात काय काय आहे?

रवीने पोस्ट केलेलं हे घर करी रोड रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या 'वन अविघ्न पार्क' या इमारतीमधील आहे. या इमारतीच्या टेरेसवर एक पेंटहाऊस आहे. या पेंटहाऊसची जाहीरात रवीने पोस्ट केली आहे. हे पेंटहाऊस तीन मजली आहे. या पेंटहाऊसला खासगी टेरेस असून त्यामधून मुंबईचा 360 डिग्री व्ह्यू दिसतो. या घरात एकूण 6 बेडरुम असून 6.5 बाथरुम आहेत. या घराचा कार्पेट एरिया 16 हजा स्वेअर फुटांचा आहे. या घराबरोबर 8 कार पार्कींग मोफत मिळणार आहेत. तसेच या घरामध्ये डेकोरेटीव्ह फर्निचर असणार आहे. घरामधील तीन मजल्यांना जोडणारी प्रायव्हेट लिफ्टही असणार आहे. या आलीशान घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी विशेष स्टाफ कॉर्टर्स असून त्यामध्ये 8 बेडची व्यवस्था असेल. रवीने दाखवलेल्या या घरामध्ये खासगी स्वीमिंग पूल असून त्याचं तापमान कंट्रोल करता येणार आहे.  

घराची किंमत किती?

आता एवढ्या सोयी-सुविधांबद्दल वाचल्यानंतर या घराची किंमत किती असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याची माहितीही रवीने दिली आहे. हे घर 120 कोटी रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असून ते भाडेतत्वावरही घेता येणार आहे. या घराचं एका महिन्याचं भाडं 40 लाख रुपये इतकं आहे.