फुल फिल्मी स्टाईल! सलमानच्या घरावरील गोळीबारानंतर आरोपी मंदिरात झोपले, पोलीस पुजारी बनून पोहोचले आणि...

Salman Khan House Firing : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केल्याचं समोर आलं आहे. आरोपींनी जी बाईक खरेदी केली होती. त्यावरुन पोलिसांनी आरोपींच्या घराचा सुगावा मिळाला. 

राजीव कासले | Updated: Apr 17, 2024, 05:06 PM IST
फुल फिल्मी स्टाईल! सलमानच्या घरावरील गोळीबारानंतर आरोपी मंदिरात झोपले, पोलीस पुजारी बनून पोहोचले आणि... title=

Salman Khan House Firing : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना फिल्मी स्टाईल अटक केली. सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर दोन्ही आरोपी गुजरातच्या (Gujrat) भूजमध्ये पोहोचले. तिथे दोघांनी एका मंदिराचा आसरा घेतला. पोलिसांना या गोष्टीचा सुगावा लागला आणि त्यांनी आरोपींना अटक करण्यासाठी सापळा रचला. मंदिरात झोपलेल्या आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पुजाऱ्यांच्या वेशात मंदिरात पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

पोलिसांनी बाईक केली जप्त
पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून MH46 R 4799 नंबरची बाईक जप्त केली. एका व्यक्तीने ही बाईक पनवेलच्या एका शोरुममधून सेकंडहँड विकत घेतली होती. ही बाईक त्याने 24 हजार रुपयांना आरोपी विक्की आणि सागरला विकली. बाईक विकत घेण्यासाठी आरोपींनी आधार कार्ड, रेंट अॅग्रीमेंट अशी खरी कागदपत्र सादर केली. रेंट अॅग्रीमेंटमधल्या पत्त्याच्या आधारे पोलीस आरोपींच्या घरापर्यंत पोहोचले. तिथे पोलिसांनी घराच्या मालकाकडून विक्की आणि सागरचे मोबाईल नंबर घेतले. मोबाईल नंबर ट्रेस केला असता दोघंही गुजरातमधल्या भूज इथं असल्याचं पोलिसांना कळलं. 

मिळालेल्या माहितीची आधारे पोलीस गुजरातच्या भूजमधल्या मढ मंदिरात पोहोचले. आरोपींनी लपण्यासाठी मंदिराचा आसरा घेतला होता. आरोपींना संशय येऊ नये यासाठी पोलिसांनी पुजाऱ्यांची वेशभूषा केली. आणि दोन्ही आरोपींना शिताफीने अटक केली.

आरोपींचा बिश्नोई गँगशी संबंध
दोन्ही आरोपींचे बिश्नई गँगशी संबंध असल्याचा संशय आहे. याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. तुरुंगात असलेल्या लॉरेन्सला या हल्ल्याची संपूर्ण माहिती होती असा पोलिसांना संशय आहे. अनमोल बिश्नोई या हल्ल्याचा मास्टरमाईड असला तरी लॉरेन्सला याची पूर्ण माहिती असावी. आरोपींना केवळ दोन राऊंड फायर करण्याचे आदेश होते. पण आरोपींना पाच राऊंड फायर केले.

नवनवे खुलासे
हल्ल्याप्रकरणी दररोज नवनवे खुलासे होत आहेत. दोन आरोपींपैकी एक आरोपी आधीपासूनच लॉरेन्स गँगशी जोडला गेला होता. तर दुसरा आरोपी नंतर गँगमध्ये आला. गोळीबार करण्यापूर्वी आरोपींना एक लाख रुपया अॅडव्हान्स देण्यात आला होता. त्याच पैशांनी दोघांनी भाड्याचं घर आणि बाईक विकत घेतली. हल्ला करण्यापूर्वी आणि हल्ल्यांतर दोन्ही आरोपी एका मोबाईल नंबरवर सतत संपर्कात होते. हा मोबाईल नंबर कोणाचा याचा पोलीस तपास करत आहेत. 

सलमानच्या घराची रेकी
सलमान खानच्या घरावर 14 एप्रिलला गोळीबार करण्यात आला. हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी सलमानाच्या घराची तीनव वेळा रेकी केली होती. दोन्ही आरोपी बिहारच्या चंपारण इथे राहाणारे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना 29 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान सलमान खानच्या घराजवळून 1 किलोमीटर दूर असलेल्या हॉटेल ताज लँड्स एंडजवळ पाहिलं गेलं होतं. आरोपीने पनवेलमध्ये ज्या ठिकाणी घर भाड्याने घेतलं होतं, त्या ठिकाणापासून सलमान खानचं फार्महाऊस अवघ्या 13 किमी दूरीवर आहे. आरोपींनी सलमानच्या फार्महाऊसची रेकी केली असल्याचंही समोर आलं आहे. 

सागरने केलं फायरिंग
सीसीटीव्हीतील फुटेजनुसार आरोपी विक्की गुप्ता बाईक चालवत होता, तर मागे बसलेल्या सागरने सलमानच्या घरावर गोळीबार केला. बाईक चालवातना विक्की लॉरेन्स गँगच्या संपर्कात होता.