मुंबई : एलफिन्स्टन पुलावर झालेल्या प्रचंड गर्दीनंतर चेंगराचेंगरी झाली आणि २२ जणांना आपला प्राण गमवावा लागला तर ३० जण जखमी झालेत. या दुर्घटनेनंतर नव्या पुलाला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, या दुर्घटना घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नव्या रेल्वे पुलासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी तात्काळ साडेनऊ कोटींचा निधी मंजूर केलाय. ९ नोव्हेंबर रोजी या पुलाच्या कामाची निविदा उघडण्यात येणार आहे.
दरम्यान, मुंबईतील सर्व रेल्वेच्या पादचारी पुलांचे आठवडाभरात ऑडिट करण्याचे आदेश दिले. तसेच प्रलंबित कामे जलदगतीने करण्याचे आदेश रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिले.
उपनगरीय प्रवाशांसाठी शंभर लोकल फेऱ्यांचे उद्घाटन करण्यासाठी मुंबईत आलेल्या गोयल यांना या अपघाताला तोंड द्यावे लागले. त्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी सर्व कार्यक्रम रद्द करून सायंकाळी उशिरापर्यंत रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जास्त गर्दीचे प्रमाण पाहून अतिरिक्त पादचारी पूल उभारण्यासंदर्भातही आदेश दिलेत.