प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : मुंबईत वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहन चालक यांच्या विरोधात पोलिसांनी कडक कारवाईला सुरवात केली आहे .वाहन चालकांचे परवाने देखील रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
विरुध्द दिशेने वाहन चालवणाऱ्या विरोधात मुंबई पोलीसांनी एक मोहीमच हाती घेतली आहे. या मोहीमेअंतर्गत 1 मार्च पासून पोलीसांनी मुंबईत 66 हजार 213 गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे बेशिस्त वाहांचालकांवर चाप बसणार आहे. तर वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी प्रमुख समस्या म्हणजे भंगार गाड्या. अशा गाड्यां कारवाई करत रस्त्यावरुन 14 हजार 353 भंगार वाहनं हटवण्यात आली आहेत.
बेशिस्त वाहन चालवणाऱ्या 22 हजार 828 वाहन चालकांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया देखिल सुरू करण्यात आली आहे . मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक नवनवीन उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये रिमूव्ह खटारा, विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याला चाप बसवणे आणि विनाकारण हॉर्न वाजवण्यांना पायबंद घालण्यासारख्या मोहीमांचा समावेश आहे.
मुंबईत विरुद्ध दिशेने वाहन चालवल्यामुळे अनेक अपघात होतात. अशा चालकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीला शिस्त लागण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे