Mumbai Metro Update: कुलाबा ते सिप्झ या भुयारी मेट्रो-3 मार्गिकेतील बीकेसी ते कफ परेड या दुसऱ्या टप्प्यातील रुळाचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळं लवकरच मेट्रो 3 ची संपूर्ण मार्गिका सुरू होण्याची शक्यता आहे. जुन ते जुलै दरम्यान मेट्रोचा संपूर्ण मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मेट्रो-3च्या पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी हा मार्ग ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. या मार्गावर 10 स्थानके आहेत. त्यानंतर आता या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. बीकेसी ते कफ परेड या मार्गावर काम सुरू असून हा संपूर्ण मार्ग 20.9 किमी लांबीचा आहे. या मार्गावर रुळांची उभारणी करण्याचे काम एमएमआरसीने पूर्ण केले आहे. त्यामुळं दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकेची कामे 88.1 टक्के इतकी पार पडली आहेत. त्यातील स्थानके आणि बोगद्यांची कामे 99 टक्के पूर्ण झाले आहेत. तर, यंत्रणेचे काम 58.7 टक्के इतके पूर्ण झाले आहे.
मेट्रो 3 मार्गिकेच्या वरळी ते सायम्स म्युझियम मार्गावर 25 हजार व्होल्टची ओव्हरहेड ट्रॅक्शन लाइन एमएमआरसीने कार्यन्वित केली आहे. या ओव्हरहेड लाइनमधून शनिवार 7 डिसेंबरपासून विद्युतप्रवाह सुरु करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकेची 88.1 टक्के काम पूर्ण झाले आहेत. कामे पूर्ण झाल्यानंतर या मार्गिकेवर मेट्रो गाडीच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. जूनपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील मार्गावरही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
कफ परेड , विधान भवन , चर्चगेट मेट्रो , हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅण्टरोड , मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी , नेहरू विज्ञान केंद्र, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिध्दीविनायक, दादर, शितळादेवी मंदिर, धारावी, बिकेसी, विद्यानगरी, सांताक्रुज, विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी , सिप्झ, आरे ही स्थानकं असतील. यापैकी आरे सोडून सर्व स्थानकं भूमिगत असतील.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 मार्गिकेची एकूण लांबी 33.5 किमी इतकी आहे. या मार्गिकेवर एकूण 27 स्थानके आहेत. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्ण मार्गिका भुयारी आहे. फक्त आरे स्थानक जमिनीवर आहे.