मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांकडून कुठलीही वस्तू विकत घेणार नसल्याची शपथ फ्रेंडस ऑफ दादर या ग्रुपनं घेतली. अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा सध्या मुंबईत गाजतोय.
त्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर रोज मॉर्निंग वॉकसाठी जमणाऱ्या या ग्रुपमधील सर्व सदस्यांनी अनधिकृत फेरीवाल्यांचा निषेध व्यक्त करत त्यांच्याकडून वस्तू विकत घेणार नसल्याची शपथ घेतली. यावेळी काही महिलांनीही शपथ घेतली.
फेरीवाल्यांचा सर्वाधिक त्रास दादरकरांना सहन करावा लागतो, त्यामुळं त्यांच्याकडून वस्तूच खरेदी न केल्यास अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न आपोआप मिटू शकतो, यासाठी सर्वसामान्य मुंबईकरांनी फेरीवाल्यांकडून वस्तू विकत घेणे टाळावं, असं आवाहनही यावेळी करण्यात आलं.
दरम्यान, एल्फिन्स्टन येथे झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप मोर्चा काढला होता. याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना हटविले नाहीतर १६ दिवशी आमच्या स्टाईलने उत्तर देण्याचे म्हटले होते.
याचे पडसाद १६ दिवशी दिसून आले. मुंबईसह उपनगरात मनसेचे खळ्ळ खट्याक झाले. त्यानंतर दोन दिवसांनी मालाड येथे फेरिवाल्यांकडून मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला झाला. त्यानंतर हा वाद अधिक चिघळलाय.
दरम्यान, न्यायालयाने फेरीवाल्यांना चपराक लगावलेय. अनधिकृतपणे व्यवसाय करता येणार नाही. दिलेल्या ठिकाणीच व्यवसाय करा, असा सल्ला दिलाय.