प्रविण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई : मुंबईकरांना यापुढं फिरायला किंवा खेळायलाच नाही, तर अगदी वाचायला देखील उद्यानात जाता येणार आहे. कारण गिरणगावातल्या परळ भागात आजपासून चक्क पुस्तक उद्यान सुरू होतंय... मुंबईतलं हे अशाप्रकारचं पहिलंच उद्यान असणार असून, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. वाचन संस्कृती टिकून रहावी तसंच नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या संकल्पनेतून हे उद्यान सुरू होतंय... आत्मचरित्र, नाट्यसंपदा, काव्यसंग्रह, बालसाहित्य अशा प्रकारातली अनेक पुस्तकं या उद्यानात वाचनासाठी उपलब्ध असणार आहे.
नाट्य कला विश्वातील माहिती देणारं 'नाट्यसंपदा', जुन्या-नव्या कवींच्या शब्दसंपत्तीचं 'काव्यसंग्रह', तंत्रज्ञान जगतातील माहिती देणार विज्ञान, चिमुरड्यांच्या आवडीच 'बालसाहित्य', थोर मोठ्यांची जिवनगाथा सांगणार 'चरित्र आत्मचरित्र', समृद्ध इतिहासाला उजाळा देणारं 'ऐतिहासिक' आणि महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास सांगणारी 'गाथा संघर्षाची' अशा विभागात तुम्हाला ही पुस्तक वाचता येणार आहेत.
आयटीसी हॉटेलच्या नजिकची लहानशी जागा अनेक वर्षे पडून होती. या जागेचा उपयोग विधायक कामासाठी व्हावा या हेतूने स्थानिक आमदार अजय चौधरी यांच्या संकल्पनेतून हे उद्यान सुरू झालय. सर्व बाजूंनी या संकल्पनेचं कौतुक होतंय. या पुस्तक उद्यानाचा उपयोग कसा केला जातोय हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे. छोट्याशा उद्यानात एकावेळी साधारण साठ-सत्तर जणांना बसण्याची ऐसपैस व्यवस्था इथे करण्यात आलीय. पुस्तकांच्या सुरक्षेसाठी लॉकर आणि देखभालीसाठी सुरक्षा रक्षकही इथे असणार आहे. बालक, तरुण ते जेष्ठांपर्यंत सर्वांच्या आवडीची पुस्तक या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे तरुणांचा ओढा या उद्यानाकडे येऊ लागलाय.
'वाचाल तर वाचाल' असा संदेश देणारे प्रबोधनकार ठाकरे, 'रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल' असा संदेश देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासोबतच समर्थ रामदास स्वामी, माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम, ब्रॅडबरी, मार्गारेट फुलर यांचे वाचनाच महत्व अधोरेखीत करणारे संदेश इथ लक्षं वेधून घेतात. 'पुस्तकांच्या सहवासात मला ज्ञानाबरोबर नेहमीच आनंद मिळालाय. इथे व्यतीत केलेला प्रत्येक क्षण सर्वात मौजेचा आणि समाधानाचा आहे', या माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या म्हणण्याची प्रचिती इथे आल्यावर नक्की येईल.