'Must' मुळे मास्क सक्तीचा घोळ, खरंच मास्क सक्ती झालीय का ?

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या गेले काही दिवस सातत्याने वाढत आहे. यामुळे पुन्हा मास्कसक्ती आणि निर्बंध लागू करावे की नाही याबाबत प्रशासन आणि मंत्रीमंडळात चर्चा आणि बैठका होत असतात.

Updated: Jun 4, 2022, 06:00 PM IST
'Must'  मुळे मास्क सक्तीचा घोळ, खरंच मास्क सक्ती झालीय का ?  title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : राज्याच्या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांचे सही असलेले एक पत्रक राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात आले आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे अत्यावश्यक असल्याची सूचना लिहिली आहे. मात्र, ही सूचना इंग्रजीत लिहिली होती आणि त्या वाक्यात must हा शब्द लिहिल्याने चांगलाच गोंधळ उडाला आहे.

Mask in closed public spaces like Trains, Buses, Cinemas, Auditorium, offices, hospitals, colleges, schools is must अशी सूचना सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी पाठविलेल्या पत्रकामध्ये लिहिली आहे. आता बऱ्यापैकी इंग्रजी येणाऱ्या व्यक्तीला इंग्रजीतील Must याचा अर्थ बंधनकारक म्हणजेच अनिवार्य असा होतो हे माहीत आहे. यामुळे इंग्रजी मिडियापासून ते हिंदी आणि मराठी मीडियाने सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक असल्याची बातमी चालवली.

आरोग्य मंत्री म्हणतात, Must म्हणजे सक्ती नाही

सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांच्या या पत्रानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. मात्र यावेळी त्यांना शब्दांचा चांगलाच खेळ करावा लागला. इंग्रजीत 'Must' शब्द वापरल्याने सक्ती होत नाही. ते मँडेटरी होत नसल्याचा अजब दावा केला.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने टास्क फोर्सची नुकतीच एक बैठक पार पडली. यात बंदिस्त ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन करावे असे ठरले. तो आवाहनाचा मुद्दा आहे, मास्कसक्ती नाही असे स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना द्यावे लागले.

Must म्हणजे नक्की काय रे भाऊ ?

राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण येईपर्यंत सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक असल्याच्या बातम्या येत होत्या. तोपर्यंत सर्वसामान्य हिरमुसले होते. मात्र, सरकारी इंग्रजी भाषेच्या ज्ञानामुळे मास्क सक्ती नसल्याचे स्पष्ट होताच सर्वसामान्यांनी सुटकेचा श्वास सोडला आणि एकमेकांना मजेत must म्हणजे नक्की काय रे भाऊ असे विचारु लागले.