काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होण्याआधीच नाना पटोले यांचा स्वबळाचा नारा

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव आघाडीवर आहे.  

Updated: Jan 22, 2021, 12:36 PM IST
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होण्याआधीच नाना पटोले यांचा स्वबळाचा नारा

दीपक भातुसे, झी, मीडिया, मुंबई : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष होण्याआधीच नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देऊन महाविकास आघाडीला छेद देण्याची तयारी सुरू केली आहे. आपल्याला पक्ष जी जबाबदारी देईल ती यशस्वी पार पाडून पक्षाला स्वबळावर सत्तेत आणण्याचं काम केलं जाईल, असं विधान नाना पटोले यांनी केलं आहे. 

एकीकडे राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केलं आहे. तसंच यापुढे महाविकास आघाडी राज्यातील बहुतांश निवडणुका एकत्र लढवेल अशी चर्चाही होते. महाविकास आघाडीतील तीनही पक्षाच्या नेत्यांनी तर अनेक वेळा हे सरकार २५ वर्ष टिकेल असा दावा केला आहे. 

असं असताना नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्याने महाविकास आघाडीत आणखी एका मुद्यावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे.काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्याला या पदावरून मुक्त करावं अशी विनंती दिल्लीतील नेत्यांना केली आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होण्याआधीच त्यांनी महाविकास आघाडीला छेद जाईल अशी भूमिका घेतली आहे.