नाणार प्रकल्प : राज ठाकरेंच्या भूमिकेला शरद पवारांचा पाठिंबा

नाणार प्रकल्पाचा फायदाच होणार 

Updated: Mar 8, 2021, 12:44 PM IST
नाणार प्रकल्प : राज ठाकरेंच्या भूमिकेला शरद पवारांचा पाठिंबा  title=

मुंबई : नाणार प्रकल्पाबाबत मांडलेल्या भूमिकेला शरद पवारांचा पाठिंबा आहे असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. नाणार प्रकल्प हातचा जाता कामा नये ही भूमिका मांडणारं पत्र राज ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या दोघांनाही पाठवलं आहे. शरद पवारांनी आपल्याला फोन करून भूमिका योग्य असल्याचं म्हटलंय असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.

आज राज ठाकरे यांची नाणारवासियांनी भेट घेतली. या भेटीत नाणारवासियांसमोर राज ठाकरे यांनी हा दावा केला. शरद पवार मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार आहेत असं राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला भेटीचा वेळ दिला नाही तरी शरद पवारांना नक्की भेटीचा वेळ देतील असा टोला राज यांनी मारला. 

राज ठाकरेंच्या भूमिकेचं देवेंद्र फडणवीसांकडून स्वागत 

राज ठाकरेंच्या नाणारच्या भूमिकेचं देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्वागत केलं आहे. 'राज ठाकरेंनी योग्य भूमिका घेतली असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. नाणारमुळे कोकणचा विकास होणार आहे असं फडणवीस म्हणाले. नाणार प्रकल्प हा राज्यातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असेल.  त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी हा प्रकल्प व्हायलाच हवा असं फडणवीस म्हणाले. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिलाय की,' मुख्यमंत्र्यांनीही काकोडकर यांच्याशी चर्चा करावी असं फडणवीस म्हणाले.