अखेर मोदीच सोडवणार महाराष्ट्राचा तिढा

गेल्या चार ते पाच दिवसांपासून शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी कमालीची आक्रमक झाली आहे.

Updated: Nov 3, 2019, 03:05 PM IST
अखेर मोदीच सोडवणार महाराष्ट्राचा तिढा title=

नवी दिल्ली: सत्तावाटपाच्या संघर्षामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी भाजपने अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धाव घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आरसेप परिषदेसाठी बँकॉकमध्ये गेले आहेत. आज संध्याकाळी ते भारतामध्ये परतणार आहेत. यानंतर मोदी महाराष्ट्रातील तिढा सोडवण्याच्या कामाला लागतील. शिवसेनेची अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याची मागणी मान्य करायची की स्वबळावर सरकार स्थापन करायचे, याचा निर्णय नरेंद्र मोदी हेच घेतील, असे सूत्रांकडून 'झी २४ तास'ला सांगण्यात आले.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी कमालीची आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत दररोज पत्रकारपरिषद घेऊन भाजपला इशारे देत आहेत. यापूर्वी शिवसेनेशी वाटाघाटी करण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र, आक्रमक झालेली शिवसेना त्यांना जुमानायला तयार नाही. अमित शहा यांनीच वाटाघाटी कराव्यात, असा आग्रह सेनेने धरला होता. त्यामुळे सत्ता स्थापन कशी करायची, असा पेच भाजपसमोर निर्माण झाला होता. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच या सगळ्यात लक्ष घालावे लागले आहे. अकोला दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री फडणवीस हेदेखील आज संध्याकाळपर्यंत मुंबईत पोहोचतील. यानंतर ते दिल्लीच्या दिशेने रवाना होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

भाजपने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. कारण, सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. यानंतर महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते. यापूर्वी भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह ८ कॅबिनेट आणि ८ राज्यमंत्री पदे अशी एकूण १६ मंत्रिपदे देण्याची तयारी दाखवली होती. परंतु, शिवसेना मुख्यमंत्रीपदावर अडून बसली आहे.