नवी मुंबई: गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेल्या बेस्टच्या संपामुळे शहरातील नागरिक प्रचंड वैतागले आहेत. हा संप इतक्या दीर्घकाळ लांबल्यामुळे अगोदरच कंगाल अवस्थेत असणाऱ्या बेस्टच्या तिजोरीला मोठा फटका बसत आहे. मात्र, हीच बाब नवी मुंबई पालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) पथ्यावर पडली आहे. बेस्टचा संप सुरु असल्याने एनएमएमटीने मुंबईकडील १४ मार्गांवर बसच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. त्यामुळे एनएमएमटीला दररोज सहा लाख रुपये इतका घसघशीत फायदा मिळत आहे.
एरवी मुंबईतील १४ मार्गांवर एनएमएमटीच्या ११४ बसेस धावतात. मात्र, बेस्टच्या संपाच्या पार्श्वभूमीवर एनएमएमटीकडून या मार्गावर ४० अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या आहेत. इतर दिवशी मुंबईत एनएमएमटीच्या साधारण ३५० फेऱ्या होतात. मात्र, सध्या एनएमएमटीने ११५ फेऱ्या वाढवल्या आहेत. त्यामुळे गेल्या सहा दिवसांत या मार्गावरील एनएमएमटीचे उत्त्पन्न पाच ते सहा लाखांनी वाढल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, 'बेस्ट' संपाबाबत उच्च न्यायालयात सोमवारी देखील निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे उद्या आठव्या दिवशीही बेस्टचा संप सुरुच राहणरा आहे. उच्चाधिकार समिती उद्या ११ वाजता आपला अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करेल. त्यानंतर न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी बेस्ट संपाचा तिढा सोडविण्यात अपयशी ठरल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सोमवारी फोनवरून चर्चा झाली. बेस्ट संपात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली, हे अद्याप समजू शकलेले नाही.