Aryan Khan Gets Bail : 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त' नवाब मलिक यांचा इशारा कुणाला?

आर्यन खान याला जामीन मिळाल्यानंतर नवाब मलकि यांनी ट्विट करत इशारा दिला आहे

Updated: Oct 28, 2021, 05:45 PM IST
Aryan Khan Gets Bail : 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त' नवाब मलिक यांचा इशारा कुणाला? title=

मुंबई : मुंबई ड्रग्ज केस प्रकरणी मागील 25 दिवसांपासून कोठडीत असणाऱ्या आर्यन खान (Aryan Khan) याला अखेर उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) जामीन मंजूर करण्यात आला आहे. आर्यनसह मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट या दोघांचा जामीनही मंजूर करण्यात आला आहे. 

आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विट केलं आहे. 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त' असं नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ट्विटच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी सूचक इशारा दिला आहे.

काय म्हणाले नवाब मलिक

मुंबई ड्रग्स प्रकरणात आर्यन खानसह तिघांना हायकोर्टाने जामीन दिला आहे, याआधी काल NDPS कोर्टाने दोघांना जामीन दिला होता. ज्या पद्धतीची खोटी केस बनवण्यात आली होती, त्यात याआधीच त्यांना जामीन मिळू शकला असता. पण एनसीबी आपली भूमिका बदलत राहिलं, त्यांना जास्त दिवस जेलमध्ये कसं ठेवता येईल, लोकांच्या मनात कशी भीती निर्माण करता येईल, यासाठी ते प्रयत्नशील होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. 

आज अखेर जामीन मिळाला आहे, ज्या लोकांविरोधात केस बनवण्यात आली होती, ती खोटी आहे. पण योगायोग असा आहे की ज्या अधिकाऱ्याने या मुलांना जेलमध्ये टाकलं होतं, आज तोच अधिकारी भीतीने हायकोर्टात गेला, मुंबई पोलीस जो तपास करत आहे, तो तपास सीबीआय किंवा एनआयएकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी हा अधिकारी आता करत आहे, असं नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचं नाव न घेता म्हटलं आहे.

जेलमध्ये टाकणारा आज जेलमध्येच जाण्याच्या भीतीने घाबरला आहे. या लोकांना जो फर्जीवाडा केला आहे, तो आता समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी या अधिकाऱ्याने मुंबई पोलिसांकडे संरक्षण मागितलं होतं, आणि आता असं काय झालं की त्यांना मुंबई पोलिसांची भीती वाटू लागली आहे. आम्हाला असं वाटतं की जो फर्जीवाडा त्यांनी केला आहे, तो समोर येण्याची भीती आता त्यांना वाटू लागली आहे. असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे