दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादीचे अनेक नेते ३० जुलैला भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते हे पक्षावर नाराज असल्याचं कळतं आहे. यामध्ये वैभव पिचड, चित्रा वाघ यांचं नाव पुढे येतं आहे. मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ येत्या ३० जुलैला भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तिघांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीकडे पाठ फिरवल्यानंतर आज सोलापूरात आमदार दिलीप सोपल आणि बबनदादा शिंदे यांनीही पक्षाच्या मुलाखतींकडे पाठ फिरवली आहे.
सध्या स्वतः अजित पवार प्रत्येक जिल्ह्यात जाऊन राष्ट्रवादीसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह दिलीप सोपल आणि बबनदादा शिंदेही भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
याआधी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्या आहे. सचिन अहिर हे माजी मंत्री देखील आहेत. त्यांनी पक्ष सोडल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्य़ानंतर आता आणखी काही नेत्यांची नावे समोर आल्याने राष्ट्रवादीच्या चिंता आणखी वाढणार आहेत.
नाराज असलेल्या नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काय करते हे पाहावं लागेल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नेते जर पक्ष सोडून गेले तर याचा सरळ परिणाम निकालांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी नाराज नेत्यांची समजूत कशी काढणार हे पाहावं लागणार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पक्ष बदलतात. सध्या शिवसेना-भाजपमध्ये इनकमिंग सुरु आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर छगन भुजबळ देखील शिवसेनेत येणार अशी चर्चा सुरू होती. पण शिवसैनिकांनीच याला विरोध सुरू केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत होणाऱ्या इनकमिंगवर शिवसैनिकांची नाराजी स्पष्ट होत आहे. मात्र आपण शिवसेनेत येणार नसल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले होते. पण राजकारणात काहीही होऊ शकते.