वानखेडेंच्या नावाने पैसे उकळण्याचं काम, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

भाजप, एनसीबी आणि काही क्रिमिनल्स मिळून या मुंबईत दहशत माजवत आहेत, पुढच्या आडवण्यात पुरावे देणार

Updated: Oct 20, 2021, 04:21 PM IST
वानखेडेंच्या नावाने पैसे उकळण्याचं काम, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप title=

मुंबई : राजकीय हेतूने काही राजकीय पक्षांच्या माध्यमातून एनसीबीचा (NCB) वापर होत आहे, विशेष लोकांना त्रास देण्यासाठी, एक दहशत निर्माण करुन पैसे उकळण्याचं काम या मुंबईत एनसीबीच्या माध्यमातून सुरु आहे, असा गंभीर आरोप अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीक काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. 

वर्सोवा पोलीस स्थानकात एका माणसाने तक्रार केलेली आहे, समीर वानखेडेंच्या (Samir Wankhede) दवाबाखाली, त्यांच्या नावाने आमच्याकडून लोकं पैसे मागत आहे अशी तक्रार एप्रिल महिन्यात झालेली आहे. मला वाटतं आता हळूहळू जे पैसे खंडणीच्या रुपाने, दबावाच्या रुपाने वसूल करण्याचा उद्योग या मुंबईत सुरु आहे, आज ना उद्या याचा भांडाफोड होणार आहे असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी रेव्ह पार्टी जेव्हा झाली आहे, त्यात जी काही लोकं सापडली, त्या प्रकरणात युरीन सँम्पल, ब्लड सॅम्पल कलेक्ट करण्यात आले, त्यावेळी त्यांना सोडण्यात आलं. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला, कोर्टासमोर हजर करण्यात आलं, आणि मग केसेस सुरु झाल्या. पण एनसीबी गेल्या एका वर्षात प्रत्येक माणसावर आरोप करतंय सेवन करतायत म्हणजे हे ग्राहक आहेत, पण कोणत्याही आरोपीचा ब्लड किंवा युरीन सॅम्पल घेतलेलं नाही, आणि जर तुम्ही ब्लड, युरीन सॅम्पल घेत नाही, फक्त व्हॉट्सअॅप चॅटवर सांगतायत की हे ड्रग्स कंज्युम करतायत, तुम्हाला हे सिद्ध करता येत नाही, खोटे केस असल्यामुळे हे सॅम्पल ते घेत नाहीत असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

समीर वानखेडेंचा मोबाईल आणून तुम्ही तपासा करा असं आवाहन नवाब मलिक यांनी केलं आहे. त्यांचे व्हॉट्सअॅप चॅट, फोन रेकॉर्डिंग जर समोर आले तर सर्व केसेस बोगस आहेत, त्याऊलट काय काय फर्जीवाडा त्यांनी या मुंबईत केला आहे, हे सिद्ध होईल, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

भाजप, एनसीबी आणि काही क्रिमिनल्स हे सर्व मिळून या मुंबईत दहशत माजवत आहेत, महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी भाजपची लोकं, काही क्रिमिनल्स, वानखेडे यांनी कोणत्या पद्धतीने या वर्षभरात काम केलं आहे, याचे पुरावे पुढच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन सिद्ध करणार आहे असल्याचा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.

खंडणी वसूल करण्याचं काम या मुंबईत सुरु आहे, लोकांना बदनाम करण्याचं काम सुरु आहे, पब्लिसिटीसाठी कोणालाही अडवण्याचं काम एनसीबीच्या माध्यमातून सुरु आहे. मोदी साहेबांनी या मुंबईत जे झोनल एनसीबीचं ऑफिस आहे, या वर्षभरात ज्या काही केसेस केल्या आहेत, त्याची ज्युडिशियल चौकशी करा, त्या माध्यमातून या मुंबईत काय सुरु आहे, हे आम्ही सिद्ध करु असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

एनसीबी प्रत्येक केसमध्ये युक्तीवाद बदलत जाते, आणि लोकांचा जामीन कसा थांबवता येईल ही एनसीबीची चाल आहे. बरिचशी उदाहरण आमच्याकडे आहेत, आमच्या केसमध्ये जेव्हा एनडीपीएसच्या न्यायालयामध्ये आम्ही जामीनासाठी गेलो, तेव्हा एक चॅट दाखवण्यात आलं, की पाच लाख रुपयांच्या फायनान्सिंगचे पुरावे आमच्याकडे आहेत. आमच्या घरातील छोट्या जावयाने मोठा जावयाला जे कर्ज दिलं होतं, ते परत मागण्याचा चॅट होता. जेव्हा चार्जशिट दाखल करण्यात आली. त्यात त्या चार्जशिटचा कोणताही उल्लेख नाही. म्हणजे लोकांना जास्त त्रास कसा द्यायचा, आणि जामीन मिळणार नाही ही भूमिका घ्यायची आमच्याकडे पुरावे आहेत, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

एका प्रकरणात एनसीबीने लिहून दिलं आहे की हे बेलेबल आहे. म्हणजे सिलेक्टिव विरोध करायचा काही लोकांना जामीन मिळवून देण्यासाठी मदत करायची, ही पद्धत एनसीबीची आहे, मी आजही ठाम आहे की ही केस फेक आहे. आता जे आरोपी आहेत त्यांचे वकिल हायकोर्टात जामीनासाठी जातील. काय निर्णय घ्यायचा आहे तो त्यांचा अधिकार आहे. 

पण मी पहिल्या दिवसापासून बोलतोय, की जर जे पुरावे आम्ही दाखवतो की यात कुठलेही ड्रग्स हे क्रुझवर सापडले नाहीत, यातला कोणताही पुरावा जे ते सादर करत आहेत, ते क्रुझवर झालेलं नाही. ज्या पुड्या, गोळ्या आणि पेपर दाखवत आहेत, ते सर्व फोटो समीर वानखेडे यांच्या कार्यालयातील आहेत. जर कोर्ट कमिशन बसलं, तर हे स्पष्टपणे समोर येईल की यांनी स्वत: बनावट फोटो जारी करून  हे केस दाखवतायत, हे फोटो एनसीबीच्या माध्यमातून तीन तारखेला, लोकांना देण्यात आलेले आहेत. जर याबाबत चौकशी झाली तर ही फेक केस आहे हे सिद्ध होईल. 

या आरोपींच्या वकिलांना आमच्याकडून काही पुराव्यांची गरज असेल, तर निश्चितपणे त्यांना मदत करण्याची भूमिका आमची राहणार आहे. गेल्या एक वर्षात एनसीबीने ज्या काही केसेस केल्या आहेत, त्यातल्या नव्वद टक्के केस फेक आहेत. त्याचे पुरावे आम्ही गोळा करतोय, हे फेक केस आहेत, याबाबात कोर्टात याचिका दाखल करतील. आणि हे कोर्टात सिद्ध होईल. असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.