अनिल देशमुखांवर सूडबुद्धीने कारवाई, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठराखण

बैठकीत राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेत चर्चा झाल्याची माहिती 

Updated: Jun 29, 2021, 11:02 PM IST
अनिल देशमुखांवर सूडबुद्धीने कारवाई, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठराखण title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज पार पडली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नेपियनसी रोड इथल्या उर्वशी या इमारती मधल्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्र्यांमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली. सोमवारपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणारे मुद्दे, विधानसभा अध्यक्ष निवडणूक, पक्षाचा विस्तार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी चौकशी प्रकरण तसंच राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेत चर्चा झाल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी बैठकीनंतर दिली आहे.

अनिल देशमुखांवर ईडीची सूडबुद्धीने कारवाई सुरु असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस अनिल देशमुख यांच्या पाठिशी असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. अनिल देशमुख पक्षाचे नेते आहे. परमबीर सिंग यांनी बदली झाल्यावर त्यांच्यावर आरोप केला आहे. केंद्र सरकारच्या दबावाखाली काही अधिकारी काम करत आहेत. देशमुख यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर सर्व आमदारांच्या कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जाईल, असं मलिक यांनी स्पष्ट केलंय. महाविकास आघाडीत वाद असल्याच्या भाजपाच्या आरोपांनाही नवाब मलिक यांनी उत्तर दिलंय. महाविकास आघाडीत कुठलाही वाद नाही. तिनही पक्षात समन्वयाने काम सुरु असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, नवाब मलिक यांच्यासह महत्वाचे नेते उपस्थित होते.