मुंबई : पंतप्रधान मोदींनी देशात १०००, ५०० रुपयांच्या नोटांबंदी जाहीर केल्यानंतर चलनात नव्या नोटा आल्यात. यात २००० रुपये आणि ५०० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. दरम्यान, २००० रुपयाची नोट चलनात आल्यानंतर काही दिवसातच बनावट नोटा पकडण्यात आल्यात. त्यामुळे नक्कल करता येणार नाही, हा दावा फोल ठरला. आता तुमच्याकडे बनावट नोट असेल तर, ती कशी ओळखणार?
नोटाबंदीनंतर चलनात ५०० आणि २०००च्या बनावट नोटा आल्या तर कशा ओळखायच्या याबाबत अनेक प्रश्न निर्माण विचारण्यात येत होते. कारण गेल्या काही दिवसात ५०० आणि २०००च्या नकली नोटा सापडल्याच्या अनेक घटना समोर आल्यात. त्यामुळे तुमच्या जवळ असलेली नोट खरी आहे की खोटी, हे आता तुम्ही रिझर्व्ह बँकेकडून जाणून घेऊ शकता.
रिझर्व्ह बँकने बनावट की खरी नोट ओळखण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरु केलेय. यावर तुम्ही १० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंत नोटा ओळखता येऊ शकतात. 'पैसा बोलता है', असे या पोर्टलचे नाव आहे. यावर तुम्हाला प्रत्येक नोटेच्या सिक्युरिटी फीचर्सबाबत माहिती तात्काळ उपलब्ध होईल.
बनावट नोट ओळखण्यासाठी paisaboltahai.rbi.org.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला Know your banknotes हा पर्याय दिसेल. यावर क्लिक करा किंवा होम पेजवरच तुम्हाला चलनातील मुख्य नोटा दिसतील. तुम्हाला जर २००० ची नोट खरी आहे का ओळखायची असेल तर होम पेजवरील २००० च्या नोटेवर क्लिक करा.
त्यानंतर रिझर्व्ह बँक तुम्हाला नोटांवर असलेल्या १२ ते १८ सिक्युरिटी फीचर्सची माहिती देईल. तुम्ही सहज ही माहिती लक्षात ठेऊ शकता. नोटा खऱ्या आहेत की खोट्या यांच्यातील फरक जाणून घेण्यासोबतच तुम्हाला या पोर्टलवर नोटांसंबंधीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं FAQ सेक्शनमध्ये पाहायला मिळतील.