मुंबई विद्यापीठासाठी नव्या कुलगुरुंचा शोध सुरू

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची हकालपट्टी अटळ असून, नव्या कुलगुरूंचा शोध सुरू झालाय. सध्या सक्तीच्या रजेवर असलेल्या देशमुखांवर कारवाईची वेळ का आली?

Updated: Sep 26, 2017, 07:44 PM IST
मुंबई विद्यापीठासाठी नव्या कुलगुरुंचा शोध सुरू  title=

दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची हकालपट्टी अटळ असून, नव्या कुलगुरूंचा शोध सुरू झालाय. सध्या सक्तीच्या रजेवर असलेल्या देशमुखांवर कारवाईची वेळ का आली?

मुंबई विद्यापीठानं घेतलेल्या सगळ्या परीक्षांचे निकाल अखेर जाहीर झाले... यात विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा निकाल लागलाच... पण त्यासोबतच कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांचाही निकाल लागलाय. देशमुख यांची कुलगुरूपदावरून गच्छंती अटळ असल्याचं सांगितलं जातंय. पदवी परीक्षांचे निकाल ऑनलाइन जाहीर करण्याचा निर्णय त्यांना चांगलाच भोवलाय.

- राज्य सरकारच्या आयटी विभागाच्या चौकशीत संजय देशमुख दोषी आढळलेत

- ऑनलाईन असेसमेंटची निविदा काढताना राज्य सरकारच्या आयटी विभागाची मान्यता घेण्यात आली नव्हती

- तसंच आयटी विभागाच्या अटी आणि शर्तींचंही उल्लंघन करण्यात आलंय

- ऑनलाईन असेसमेंटसाठी मेरीट ट्रॅक कंपनीसोबत कोणताही करार करण्यात आला नाही

- ऑनलाईन असेसमेंटसाठी काम करणा-या तिन्ही विभागांचा एकमेकांशी समन्वय नव्हता, असं या चौकशीत आढळून आलंय

त्यामुळं येत्या काही दिवसातच संजय देशमुखांना पदावरुन हटवण्यात येणार असून त्यांच्या जागी नव्या कुलगुरूंची नेमणूक करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन पेपर तपासणीत नेमका कसा घोळ झाला, ते पाहूयात...

- २४ जानेवारीला कुलगुरूंनी ऑनलाइन असेसमेंटचा निर्णय घेतला

- २७ एप्रिलला मेरीट ट्रॅक कंपनीची निवड झाली

- ५ जूनपर्यंत काही मोजक्याच उत्तरपत्रिकांची तपासणी होऊ शकली

- ४ जुलैला राज्यपालांनी निकाल जाहीर करण्यासाठी ३१ जुलैची डेडलाईन दिली

- ३१ जुलैची डेडलाईन विद्यापीठाला पाळता आली नाही

- ९ ऑगस्टला कुलगुरू देशमुखांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं

- दरम्यानच्या काळात निकाल जाहीर करण्याच्या चार डेडलाइन टळल्या

- २४ सप्टेंबरला आयटी विभागाच्या चौकशीत देशमुख दोषी आढळले

कुलगुरूंच्या हट्टापायी लाखो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं. ते भरून निघणार नसल्यानं कुलगुरूंवरील कारवाई अटळ आहे. मुंबई विद्यापीठ हे जगात मान्यता असलेलं महत्त्वाचं विद्यापीठ... या विद्यापीठाच्या कुलगुरूंना अशा मानहानीकारक पद्धतीनं पायउतार व्हावं लागत असेल तर ती निश्चितच लाजिरवाणी बाब आहे.