बाळासाहेबांनी रचला होता आनंद दिघे यांच्या हत्येचा कट, निलेश राणे यांचा गंभीर आरोप

'सोनू निगम यांना ठार मारण्याचे कुणी प्रयत्न केले? ठाकरे घराणं आणि गायक सोनू निगमचं नातं काय?'

Updated: Jan 15, 2019, 08:42 AM IST
बाळासाहेबांनी रचला होता आनंद दिघे यांच्या हत्येचा कट, निलेश राणे यांचा गंभीर आरोप title=

मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी रत्नागिरीत थेट दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ठाण्यातले शिवसेना नेते आनंद दिघे यांना कोणी मारलं? गायक सोनू निगम यांना ठार मारण्याचे कुणी प्रयत्न केले? ठाकरे घराणं आणि गायक सोनू निगमचं नातं काय? बाळासाहेबांच्या कर्जतमधल्या फार्महाऊसवर कुणा-कुणाला ठार मारलं? हे सर्व जाहीर सभेत सांगू, असा इशाराच निलेश राणे यांनी दिला. 

निलेश राणेंचे गंभीर आरोप 

सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या १० वर्षांतल्या राजकारणात ९ जणांचा बळी नेमके कुणी घेतले?, असा सवाल करत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर गंभीर आरोप केले होते. त्याला उत्तर देताना निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. 

अधिक वाचा :- 'राणेंच्या १० वर्षांच्या राजकारणात ९ जणांचे बळी कुणी घेतले?'

राणे साहेबांनी आणि आम्हीही आजपर्यंत एक मर्यादा पाळली. आम्ही कधी बाळासाहेबांबद्दल काही बोललो नाही. कारण आम्हाला आमच्या मर्यादा माहित होत्या. राणे साहेबांचं बाळासाहेबांवर एवढं प्रेम होतं की हे त्यांना कधी सांगता आलं नाही. पण माझ्या वडिलांचा जाहीर कार्यक्रमात कुणी अपमान करत असेल आणि एवढ्या खालच्या दर्जाची टीका करत असेल तर एक मुलगा म्हणून मला त्याला प्रत्युत्तर द्यावंच लागेल. माझ्यासाठी राणे साहेब महत्त्वाचे, बाळासाहेब नाही... आम्ही जेवढी मर्यादा ठेवली होती ती मर्यादा विनायक राऊतांनी व्यासपीठावर सोडली, असं म्हणत निलेश राणे यांनी शिवसेनेचं 'दैवत' असणाऱ्या दिवंगत बाळासाहेब ठाकरेंवर गंभीर आरोप केले.

आनंद दिघेंची हत्या?

'आनंद दिघेंचा मृत्यू नेमका कसा झाला? कट कसा रचला गेला आणि त्यांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये कसा दाखवण्यात आला? दिघेंचा मृत्यू दोन शिवसैनिकांना सहन झाला नाही... त्यांनी तोंड उघडू नये यासाठी त्यांनाही बाळासाहेबांच्या सांगण्यावरून ठार मारण्यात आलं', असंही निलेश राणेंनी म्हटलंय.

सोनू निगम आणि ठाकरे घराण्याचा संबंध काय?

यावेळी, गायक सोनू निगम यालाही ठार मारण्याचा बाळासाहेबांनी प्रयत्न केला, असाही आरोप राणेंनी केलाय. 'बाळासाहेबांच्या सांगण्यावरून शिवसैनिक अनेकदा सोनू निगम यांना मारण्यासाठी गेले होते. सोनू निगम तेव्हा घाबरले असतील पण आज बाळासाहेब नाहीत तर ते कदाचित याबद्दल सांगू शकतील... काय नातं होतं सोनू निगम आणि ठाकरे घराण्याचं हे मला सांगायला लावू नका... मला तोंड उघडायला लावलंत तर जाहीर सभेमध्ये हे सांगेन...' 

कर्जतच्या फार्म हाऊसवर कुणाकुणाचे मृत्यू झाले... कोण कोण गेलं होतं कर्जतच्या फार्म हाऊसवर हे सर्व जाहीर करेन... आमच्या नादाला लागायचं नाही राणे म्हणतात आम्हाला, असा इशाराच निलेश राणेंनी शिवसेनेला दिलाय.