अनलॉक संदर्भात राज्य सरकारकडून अजूनही आदेश जारी नाही

१८ जिल्ह्यातील लॉकडाऊन उठवण्याबरोबरच इतर जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याबाबतचा प्रस्तावाला अजूनही मंजुरी नाही

Updated: Jun 4, 2021, 07:42 PM IST
अनलॉक संदर्भात राज्य सरकारकडून अजूनही आदेश जारी नाही title=

दीपक भातुसे, मुंबई : राज्य अनलॉक करण्यासंदर्भात राज्य सरकारने अद्याप आदेश जारी केलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या ज्या जिल्ह्यात कमी आहे अशा १८ जिल्ह्यातील म्हणजेच निम्म्या महाराष्ट्रातील लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात काल पार पडलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत चर्चा झाली. 

१८ जिल्ह्यातील लॉकडाऊन उठवण्याबरोबरच इतर जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या मंजूरीनंतर जाहीर केला जाणार होता. मात्र त्या आधीच आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी राज्य अनलॉक झाल्याची काल घोषणा केली. 

मुख्यमंत्री कार्यालयाने तात्काळ याबाबत खुलासा करून असा निर्णय झाला नसल्याचं जाहीर केलं. या गोंधळात आज दुपारी राज्य अनलॉक करण्यासंदर्भात निर्णय होईल असं पुन्हा एकदा वड्डेटीवार यांनी जाहीर केलं. मात्र याबाबतचा आदेश अद्यापही काढण्यात आलेला नाही.