यावर्षी शाळांची फी वाढ नाही?

शिक्षण विभाग दोन दिवसांत निर्णय जारी करण्याची शक्यता

Updated: May 1, 2020, 05:43 PM IST
यावर्षी शाळांची फी वाढ नाही? title=

दीपक भातुसे, प्रतिनिधी :  कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील लाखो पालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. यावर्षी शाळांची फी वाढ करु नये अशी भूमिका राज्याच्या शिक्षण विभागाने घेतली असून याबाबत एक-दोन दिवसांत शासन निर्णय जारी करणार आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार आणि कामधंदा ठप्प आहे. अनेक पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कोरोना लॉकडाऊन संपल्यानंतरही आर्थिक संकट कायम राहणार आहे. पुढच्या काळात पालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे शाळांची फी भरतानाही पालकांच्या नाकीनऊ येणार आहेत. या सगळ्या बाबींचा विचार करून शिक्षण विभागाने यावर्षी फी वाढीला निर्बंध घालायचं ठरवलं आहे.

सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी या बोर्डांच्या शाळांनीही फी वाढ करू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. या बोर्डाच्या अध्यक्षांशी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड चर्चा करणार आहेत. या बोर्डाच्या शाळा राज्य सरकारच्या अखत्यारित येत नसल्या तरी त्यांच्याशी चर्चा करून फी वाढ टाळता येईल का यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

याआधीही राज्य सरकारने फी बाबत दिलासा दिला आहे. थकित असलेल्या फीसाठी तगादा लावू नका अशी सूचना शिक्षणमंत्र्यांनी केली होती.

कोरोनामुळे पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा या आधीच रद्द करण्यात आल्या आहेत. तर दहावीचा भूगोल विषयाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आधीच जाहीर केला आहे.

 

आता फी वाढीबाबत महत्वाचा आणि पालकांना दिलासा देणारा निर्णय सरकार जाहीर करणार आहे. खाजगी शाळांमधील फी दरवर्षी वाढवली जाते. जूनमध्ये सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षात ही फी वाढवली जाणार होती. त्यामुळे त्याआधीच निर्णय जाहीर करून या वर्षभरापुरती फी वाढ रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे