Mumbai: आता पाच रुपयेही पुरणार नाहीत; मुंबईकरांचा 'बेस्ट' प्रवास पुन्हा महागणार?

Mumbai BEST price hike: आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट प्रशासनाला मुंबई महापालिकेने दरवाढ सूचवली आहे. बेस्ट उपक्रमाने पालिका प्रशासनाकडे तीन हजार कोटींची मागणी केली होती. मात्र पालिकेने पैसे देण्यास नकार देत बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्न वाढीचे पर्याय सूचवले आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Apr 30, 2024, 10:37 AM IST
Mumbai: आता पाच रुपयेही पुरणार नाहीत; मुंबईकरांचा 'बेस्ट' प्रवास पुन्हा महागणार? title=

Mumbai BEST price hike: सध्या सगळ्याच गोष्टींमध्ये महागाईचा भडका उडाला आहे. अशातच मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री बसणार आहे. याचं कारण म्हणजे सामन्यांसाठी बेस्टचा प्रवास महागणार असल्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किमान तिकीट साधी बस सात रुपये तर एसी बसचे दहा रुपये होणार आहे. सध्या साध्या बसचे किमान तिकीट ५ रुपये तर वातानुकूलित बसचे किमान तिकीट 6 रुपये आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट प्रशासनाला मुंबई महापालिकेने दरवाढ सूचवली आहे. बेस्ट उपक्रमाने पालिका प्रशासनाकडे तीन हजार कोटींची मागणी केली होती. मात्र पालिकेने पैसे देण्यास नकार देत बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्न वाढीचे पर्याय सूचवले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर बेस्ट बसच्या प्रवाशांना दरवाढीचा झटका बसणार आहे. 

दररोज 35 लाख प्रवासी करतात प्रवास 

सन 2016 ते आतापर्यंत पालिकेने बेस्ट उपक्रमास तब्बल 8,500 कोटींची आर्थिक मदत केली. मात्र आतापर्यंत केलेल्या मदतीचा हिशोब बेस्ट उपक्रमाने पालिकेला दिलेला नाही. त्यामुळे 3 हजार कोटींची बेस्टची मागणी फेटाळत आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्न वाढीचे निर्देश पालिका प्रशासनाने बेस्ट उपक्रमास दिले आहेत. 

दरम्यान या संदर्भात मुंबईतील आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने बेस्टच्या बस भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. भाजप हे मुंबईविरोधी असल्याचे आम्ही नेहमीच म्हणत आलो आणि ही प्रस्तावित भाडेवाढ हा मुंबईकरांचा खिसा कापण्याचा आणखी एक मार्ग आहे.

सध्याचे तिकीट दर 

साधारण बसेस 

  • 5 किमी - 5 रुपये
  • 10 किमी - 10 रुपये
  • 15 किमी - 15 रुपये
  • 20 किमी व पुढे 20 रुपये

एसी बसचे दर

  • 5 किमी - 6 रुपये
  • 10 किमी - 13 रुपये
  • 15 किमी - 19 रुपये
  • 20 किमी व पुढे 25 रुपये