मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : क्रीडाक्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिवछत्रपती पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली.
यात विविध खेळांमध्ये प्राविण्य दाखवणारे खेळाडू, प्रशिक्षक आणि संघटकांना मिळून १८८ पुरस्कार जाहीर झाले. मात्र यामध्ये दिव्यांग खेळाडूंची संख्या आहे केवळ एक...ज्या खेळाडूंना कौतुकाची खरंतर जास्त गरज आहे आणि ज्यांचे कष्टही अधिक आहेत, त्यांच्यावरच वर्षानुवर्ष असाच अन्याय सुरू आहे...
खेळात आपल्या संघाला, आपल्या देशाला विजय मिळवून देण्यासाठी अपार कष्ट घेणारे हे खेळाडू... सर्वसामान्य खेळाडूंपेक्षा खरंतर त्यांची मेहनत काकणभर जास्तच... पण त्यांच्या वाट्याला कायम उपेक्षाच येतेय... राज्यातल्या प्रतिष्ठेचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांच्या रचनेपासूनच या उपेक्षेची सुरूवात होते... या यादीमध्ये दिव्यांग खेळाडूसाठी एकलव्य पुरस्कार दिला जातो. मात्र सर्वसामान्य खेळाडूंना प्रत्येक क्रिडा प्रकारानुसार वेगवेगळे पुरस्कार वाटले जात असताना एकलव्य पुरस्कार मात्र सर्व खेळांमध्ये मिळून एकच मिळतो... यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना दिव्यांग खेळाडूंमध्ये बळावलीये.
काही वर्षांपूर्वी दिव्यांग खेळाडूला दिला जाणारा हा पुरस्कारही शिवछत्रपतींच्या नावानंच होता. काही वर्षांपूर्वी त्याचं नामांतर झालं. मात्र जी प्रतिष्ठा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराला आहे, ती एकलव्य पुरस्काराला नाही. त्यामुळे या पुरस्काराचं महत्त्व सर्वसामान्यांनाही वाटेनासं झालंय. एकलव्य पुरस्कार देताना सामान्यांपेक्षा वेगळे निकष लावणं गैर असल्याबाबत एक निवेदन काही खेळाडूंनी क्रीडामंत्र्यांना दिलं होतं. मात्र यंदाही जुन्या पद्धतीत कोणताच बदल झाला नाही. त्यामुळे दिव्यांग खेळाडूंची निराशा झालीये. याबाबत विचारलं असता याबाबत विचार करण्याचं ठोकळेबाज उत्तर देऊन विनोद तावडेंनीही वेळ मारून नेली...
आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी केलेले अनेक दिव्यांग खेळाडू महाराष्ट्रात आहेत... पण क्रिकेट आणि अन्य खेळांमध्ये जसा दुजाभाव केला जातो, तसाच सामान्य खेळाडू आणि दिव्यांग खेळाडूंमध्येही केला जातो ही खेदाची बाब म्हणावी लागेल. आपल्या शारिरीक कमतरतेवर मात करून इतरांना जगण्याची प्रेरणा देणाऱ्या या खेळाडूंना खरंतर अधिक चांगली वागणूक मिळायला हवी... पण सरकारी खात्यांमध्ये खिलाडूवृत्तीचा आभाव असल्यावर दुसरं काय होणार ?