पीएसमी बँकेचे संचालक जॉय थॉमस यांना अटक

हा गैरव्यवहार समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लादण्यात आले होते.

Updated: Oct 4, 2019, 09:38 PM IST
पीएसमी बँकेचे संचालक जॉय थॉमस यांना अटक title=

मुंबई: पंजाब अँण्ड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात शुक्रवारी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचे निलंबित संचालक जॉय थॉमस यांना अटक केली. जॉय थॉमस यांना शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावले होते. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. 

काही दिवसांपूर्वीच पीएमसी बँकेकडून थकित कर्जाबद्दलची खोटी माहिती रिझर्व्ह बँकेला देण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. विशेष म्हणजे बँकेने दिलेल्या एकूण कर्जापैकी ७५ टक्के कर्ज हे एकट्या एचडीआयएल कंपनीलाच देण्यात आले होते. एचडीआयएल समूहातील कंपन्यांना ४४ वेगवेगळया खात्यांद्वारे हे कर्ज देण्यात आले होते. मात्र, पीएमसी बँकेने २१ हजार बनावट खाती तयार त्याद्वारे कर्ज घेतल्याचे दाखवले होते. याशिवाय, पीएमसीने रिझर्व्ह बँकेला दिलेल्या माहितीमध्येही एचडीआयएल आणि समूहातील कंपन्यांच्या कर्जाचे तपशील दडवून ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे (एचडीआयएल) संचालक सारंग वाधवा आणि राकेश वाधवा यांना अटक केली होती. गेल्या काही दिवसांपासून आर्थिक गुन्हे शाखेकडून या दोघांची चौकशी सुरु होती. मात्र, चौकशीत सहकार्य करत नसल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले. 

हा गैरव्यवहार समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लादण्यात आले होते. त्यानुसार पीएमसीला रिझव्‍‌र्ह बँकेच्या परवानगीशिवाय कर्ज वितरणाला, नवीन गुंतवणूक करण्याला किंवा निधी मिळवून दायित्व वाढविता येणार नाही. त्याचप्रमाणे नव्याने ठेवी स्वीकारण्याला, तसेच ठेव वठविणे, देणी चुकती करण्याला आणि आपल्या कोणत्याही स्थावर मालमत्ता व संपत्तीची विक्री, हस्तांतरण किंवा अन्य मार्गाने विल्हेवाटीवर बंदी आली आहे.