मुंबई : पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. खातेदारांच्या पैशांवर अनेकांनी वैयक्तिक मालमत्ता जमवली आहे. बँकेचे माजी अध्यक्ष वरियम सिंहने मुंबईच्या जुहू भागात २५०० कोटींचा एक प्लॉट घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अमृतसरमध्ये लेमन ट्री नावाचे फाईव्ह स्टार हॉटेल खरेदी केले आहे. त्यासोबतच मनमोहन आहुजाचे नाव पुढे आले.
मनमोहन आहुजा वरियम सिंहसाठी उत्तर भारतात काम करत होता. पीएमसी प्रकरणात अटकेत असलेल्यांसाठी देखील कोट्यवधींची मालमत्ता पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात खरेदी केले आहे. दुसऱ्या राज्यातही याप्रकरणाचा तपास सुरु आहे. यासोबतच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरबीआयला सादर करण्यात आलेल्या अहवालात ४४ खात्यांमध्ये फेरफार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, जॉय थॉमसने जुनेत हे नाव बदलून पुण्यात ९ फ्लॅट्स घेतले. ही प्रॉपर्टी नक्की कोणाच्या पैशांनी घेतली ? याचा तपास सध्या EOW करीत आहे. थॉमसच्या दुसऱ्या पत्नीला ७ दिवसात EOW मध्ये हजर राहण्यास ही सांगितले आहे. तीचं माहेर कुर्ल्यात असल्याचे कळत आहे. जॉय थॉमसला दुसऱ्या पत्नीकडून एक मुलगा आणि एक दत्तक मुलगी आहे. थॉमसच्या म्हणण्यानुसार त्याच्या आणि दुसऱ्या पत्नीच्या वयात ३० वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे हे ९ फ्लॅट आणि एक बुटीक विकत घेतले असल्याचे समोर येत आहे. त्यातील ८ फ्लॅट भाड्याने देण्यात आले. थॉमसला ३ लाख रुपये पगार होता. पीएमसी बँकेने त्याला मर्सिडीज ही दिल्याची माहिती समोर येत आहे.