Mumbai News Today: मानखुर्दमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आजारी असलेल्या पोटच्या लेकालाच 37 वर्षीय पित्याने जीवे ठार मारले आहे. पोलिसांनी या नराधम पित्याला अटक केली असून आरोपीचे नाव इम्रान अन्सारी आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी पत्नी सकीना आणि त्यांचा दीड वर्षांचा मुलगा अफान यांच्यासोबत राहत होता. अफान किडनीच्या आजाराने ग्रस्त होता. त्यामुळं दीर्घकाळापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याच्या उपचारांसाठी मोठा खर्च होत होता. त्यामुळं इम्रान आणि सकीना हे आर्थिक संकाटांसोबत लढत होते. शनिवारी अफान अचानक आजारी पडला. त्याला खूप जास्त वेदना होत होत्या. त्यावेळी इम्रान त्याच्यासोबत एकटाच घरी होता.
अफानची आई सकीनाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती जेव्हा घरी आली तेव्हा अफान झोपलेला होता. नेहमी वेदनेने कळवळणाऱ्या अफानला शांतपणे झोपलेले पाहून सकीनाला थोडे आश्चर्य वाटले. तिने मुलाला जागे करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तो रडला सुद्धा नाही. सकीनाला अफान बेशुद्ध असल्याचा संशय आला. तसंच, त्याच्यासोबत काहीतरी वाइट घडले असावे, या भीतीने तिने पती इम्रानसोबत त्याला रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी अफानला तपासल्यानंतर मृत घोषित केले. अफानच्या डोक्यावर जखमांचे निशाण दिसत होते. त्यामुळं पोलिसांना या प्रकरणात काही काळेबेरं असल्याचा संशय आला. त्यांनी लगेचच पोलिसांत याबाबत माहिती दिली. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी इम्रानची चौकशी करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रानने सुरुवातीला पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांने गुन्हा कबूल केला. त्यांने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबानुसार, अफान सतत रडत होता. त्याचे रडणे थांबवण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले मात्र तो थांबतच नव्हता. या रडण्यामुळं चिडलेल्या अफानने त्याचे डोके जमीनीवर आपटले. त्याचबरोबर इम्रानने पोलिसांना सांगितले की, अफान किडनीच्या आजारामुळं ग्रस्त होता. त्यामुळं त्याच्या उपचारांच्या खर्चामुळं तो वैतागला होता. त्यामुळं त्याने हे पाउल उचलले.
इम्रानने गुन्हा कबुल केल्यानंतर मानखुर्द पोलिसांनी त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहेय