उरण : नवी मुंबईतील उरण जवळील मोठमोठे प्रकल्प दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे उघडकीस आले आहे. उरण जवळील खोपटा पुलावर त्यासंबंधित मजकूर आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या मजकुरामध्ये इसिस, दहशतवादी अबू बकर अल बगदादी, हाफिज सईद, रहीम कटोरी आणि राम कटोरी यांचा उल्लेख आहे.
काही संशयास्पद नावांशिवाय धोनी, केजरीवाल यांची नावेही यात सांकेतिक स्वरूपात वापरण्यात आली आहेत. तसेच जेएनपीटी, एअरपोर्ट आणि गॅस पेट्रोलच्या प्रकल्पाचे नकाशे काढून त्यावर मजकूर लिहिला आहे. तर दुसऱ्या एका आकृतीत कुर्ला गोरखपूर असा उल्लेख करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी हे दहशतवादी मजकूर लिहिले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. दरम्यान, हा मजकूर निदर्शनास आल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पुलाच्या पिलरवर दहशतवादी संदेश लिहिणाऱ्याचा कसून शोध सुरू आहे.
मच्छीमारांनी ही माहिती पोलिसांना दिली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात कंटेनरची ये-जा सुरु असते. जेएनपीटीकडे जाणाऱ्या या वाटेवर सुरु असणाऱी वाहनांची वरदळ आणि एकंदर या आकृत्यांमध्ये आढळलेला मजकूर पाहता नजीकच्याच काही ठिकाणांचा त्यात उल्लेख आहे. त्यामुळेच संरक्षण यंत्रणा अधिकाधिक सतर्क असल्याचं कळत आहे. त्यामुळे आता या तपासामध्ये नेमकी कोणती माहिती हाती लागते, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.