मोदी-अदानींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करणार! काँग्रेसकडून 31 मार्चला राज्यभरात...

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून ठिकठिकाणी निदर्शनं केली जात आहेत, आता काँग्रेसच्यावतीने राज्यभरात पत्रकार परिषदा घेतल्या जाणार असून भाजप सरकारला जाब विचारला जाणार आहे.

Updated: Mar 30, 2023, 07:03 PM IST
मोदी-अदानींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करणार! काँग्रेसकडून 31 मार्चला राज्यभरात... title=

Congress on Modi-Adani : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस (Congress) आक्रमक झाली आहे. देशभरात मोर्चे काढण्यात येत आहेत. आता राज्यातही काँग्रेसच्यावतीने रणनिती आखण्यात आली आहे. मोदी-अदानीच्या (Modi-Adani) भ्रष्ट युतीने देशाच्या लोकशाही आणि संविधानावर घाला घातला असून सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवून हुकूमशाही कारभार सुरु आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. अदानीच्या उद्योगात (Adani Group) 20 हजार कोटी रुपये कुठून आले? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. 

काँग्रेस पक्षाने मोदी-अदानी भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करण्यासाठी 29 तारखेला देशभर पत्रकार परिषदा घेतल्या, आता 31 मार्चला राज्यातील सर्व जिल्ह्यात पत्रकार परिषदा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसच्यावतीने देण्यात आली आहे. यासाठी राज्यातील काँग्रसचे प्रमुख नेते ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहेत. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) ठाणे इथं, विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) अहमदनगर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) परभणी तर पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) पुणे शहरात पत्रकार परिषद घेणार आहेत.  याशिवाय माजी मंत्री, प्रदेश कार्याध्यक्ष, मुख्य प्रवक्ते, प्रवक्ते, आमदार, खासदार आणि प्रमुख नेते राज्यातील इतर जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन मोदी-अदानी भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करतील असं सांगण्यात आलं आहे.अदानी सुमहात 20 हजार कोटी रुपये कुठुन आले? याची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. 

काँग्रेसची राज्य सरकारवर टीका
राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारच्या 9 महिन्यातील कारभाराने महाराष्ट्राच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे, काही संघटनांच्या भडकाऊ भाषणांनी राज्यात धार्मिक वाद वाढत आहेत. पण शिंदे-फडणवीस सरकार त्यावर काहीच कारवाई करत नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने तर महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे, ते काहीच करत नाही म्हणून धार्मिक वाद विकोपाला जात आहेत असा संताप व्यक्त केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारला ही मोठी चपराक असून सत्तेवर राहण्याचा त्यांना अधिकार राहिलेला नाही त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे. 

शिंदे-फडणवीस सरकारवर सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलेला संताप योग्यच आहे असे म्हणत नाना पटोले यांनी सरकारवर तोफ डागली आहे.राज्यात कायदा सुव्यवस्था नावाचा प्रकार कुठेच दिसत नाही. सत्ताधारी पक्षातील आमदार खासदार खुलेआम गुंडगिरी करतात. गृहमंत्र्याच्या घरात कुख्यात माफीयाचा हस्तक राजरोस वावरतो तरी पोलीस यंत्रणा आणि गृहमंत्र्याला त्याची खबर लागत नाही. माजी मंत्री, आमदार यांच्यावर हल्ले होतात तरीही त्याची दखल घेतली जात नाही. सत्ताधारी पक्षाचा आमदार गोळीबार करतो तरी त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते, असा आरोपही नाना पटोले यांनी केलाय.