वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता - ऊर्जामंत्री नितीन राऊत

अचानक मुंबई आणि उपनगरातील बत्ती गुल झाली होती. याप्रकरणी राज्याचे ऊर्जामंत्र्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

Updated: Oct 14, 2020, 07:01 AM IST
वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता - ऊर्जामंत्री नितीन राऊत   title=
संग्रहित छाया

मुंबई : अचानक मुंबई आणि उपनगरातील बत्ती गुल झाली होती. याप्रकरणी राज्याचे ऊर्जामंत्र्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत हा गौप्यस्फोट केला आहे. 

१२ ऑक्टोबरला सकाळच्या सुमारास संपूर्ण मुंबई आणि उपनगरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यानंतर टप्प्या टप्प्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र याकाळात वीज पुरवठ्यावर अवलंबून असलेल्या सेवांना याचा चांगलाच फटका बसला. याघटनेनंतर मुख्यमंत्र्यांनीही तातडीची बैठक घेत घटनेचा आढावा घेतला. तर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. मात्र ऊर्जामंत्र्यांनी केलेल्या ट्विटनंतर याप्रकरणाला वेगळं वळण लागले आहे. 

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यात बिघाड झाल्यामुळे सकाळी १० वाजताच्या सुमारास वीजपुरवठा खंडीत झाला. तथापि, युद्धपातळीवर तीन साडेतीन तासातच बहुतांश वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. वीज पुरवठा खंडित झालेल्या घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे तसेच यापुढे याची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीत दिले.

या बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वस्तुस्थिती सादर केली. त्याचप्रमाणे रुग्णालये आणि रेल्वेचा वीजपुरवठा प्राधान्याने सुरळीत करण्यात आला अशी माहिती ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी दिली.