Prajkta Tanpure Corona Positive | राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण

राज्यात कोरोनासह (Corona)ओमायक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्या ही आधीच्या दिवसापेक्षा जास्त येत आहे.   

Updated: Dec 29, 2021, 11:10 PM IST
Prajkta Tanpure Corona Positive |  राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण title=

मुंबई : राज्यात कोरोनासह ओमायक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्या ही आधीच्या दिवसापेक्षा जास्त येत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाची चिंता वाढील लागली आहे. त्यातच आता महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण (Prajkta Tanpure Corona Positive) झाली आहे. स्वत: तनपुरे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी आवाहनही केलं आहे. तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. ते राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. (prajakt tanpure tested corona positive who minister of state of maharashtra for urban development in maharashtra government)

ट्विटमध्ये काय म्हंटलंय?  

"आज (29 डिसेंबर) माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली काळजी घ्यावी. तसेच कोरोनाची लक्षणं आढळल्याल टाळाटाळ न करता त्वरित उपचार घ्यावेत", असं तनपुरे यांनी ट्विटमध्ये म्हंटलंय. 

कोण आहेत प्राजक्त तनपुरे? 

प्राजक्त तनपुरे हे उच्चशिक्षित आहेत. प्राजक्त तनपुरे यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले. तनपुरे यांची सध्या राजकारणात तिसरी पिढी सक्रिय आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही नगरपरिषदेपासून झाली. त्यानंतर त्यांच्या प्रगतीचा आलेख हा चढाच राहिला. 

प्राजक्त तनपुरे पहिल्याच संधीत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगरच्या राहुरी-पाथर्डी मतदारसंघातून निवडून आले. विशेष म्हणजे त्यानंतर त्यांना राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. सध्या त्यांच्याकडे  आदिवासी, उच्च आणि तंत्र शिक्षण, नगरविकास आणि आपत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसन या विभागाच्या राज्यमंत्रीपदाची सूत्रं आहेत.   

सुप्रिया सुळेही पॉझिटिव्ह

दरम्यान आज (29 डिसेंबर) राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली. सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांचे पती सदानंद सुळेही कोरोनाच्या कचाट्यात सापडले. सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली. 

राज्यात दिवसभरात किती रुग्ण? 

दरम्यान आज राज्यात दिवसभरात 3 हजार 900 कोरोना रुग्णाचं निदान झालं आहे. तर 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसऱ्या बाजूला मुबंईत कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळाला आहे. मुंबईत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. मुंबईत 24 तासांमध्ये 2 हजार 510 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.