Prakash Ambedkar Says Ready To Go With RSS on One Condition: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi President Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएससोबत (RSS) जाण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी एक अट घातली आहे. सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) ही अट घातली आहे. 'झी 24 तास'च्या 'Black and White' या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांच्याशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्यापैकी त्यांनी आरएसएससोबत जाण्याची तयारी असल्याचंही एका अटीचा उल्लेख करत म्हटलं.
तुमचा हिंदू (Hindu) धर्माला विरोध नाही. तर रुढी, प्रथा, परंपरांना आहे का? असं विचारला असता प्रकाश अंबेडकरांनी, "रुढी, परंपरा आणि मनस्मृतीला (Manusmriti) विरोध आहे. कारण रुढी, परंपरा या सर्व मनस्मृतीमध्ये आहेत. म्हणून बाबासाहेबांनी (Dr. Babasaheb Ambedkar) ऋगवेद, यजुर्वेद जाळलं नाही. पौराणिक साहित्य जाळलं नाही. त्यांनी फक्त मनस्मृती जाळली," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
"आजही माझी सरळ आरएसएसवाल्यांना ऑफर आहे. हे सगळं करण्यापेक्षा आम्ही तुमच्यासोबत बसतो ना. आमची फक्त एकच कंडिशन आहे, बाबासाहेबांनी मनस्मृती जाळायचं कृत्य महाडमध्ये केलं तेच मोहन भागवतांनी नागपूरमध्ये करावं. मग आरएसएस बदललं असं आम्ही म्हणू. संवैधानिक व्यवस्था मान्य करायला सुरुवात झाली असं समजू आणि आम्ही बसू त्यांच्याबरोबर. ते काही दुश्मन नाहीत. या ठिकाणी मतभेद आहेत. आपण भारताचे नागरिक आहोत एकमेकांचे दुश्मन नाही. मतभेद आहेत. फंडामेंटल मतभेद आहेत," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
"उद्याचं समाजव्यवस्थेचं राज्य हे उतरणीच्या व्यवस्थेनं चालायचं की समतेच्या व्यवस्थेनं चालायचं हे फंडामेंटल भांडण आहे. त्यांना इथली व्यवस्था उतरंडीच्या मार्गाने घेऊन जायची आहे. आम्हाला समतेच्या मार्गाने घेऊन जायचं आहे. ते जोपर्यंत समतेच्या बाजूने येत नाहीत तोपर्यंत आमच्याकडून त्यांना ग्रीन सिग्नल नाही. मनस्मृती जाळावी या माझ्या ऑफरवर मोहन भागवतांनी उत्तर दिलेलं नाही," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधात असल्याचं लोकांना आता समजत आहे. यापुढे आम्ही सत्तेत दिसू. सत्तेसाठी आम्ही तत्वं सोडली नाहीत असं प्रकाश आंबेडकर यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.