बंदमध्ये दगडफेक करणारे तोंड झाकून आले होते - प्रकाश आंबेडकर

'आजच्या महाराष्ट्र बंदला जनतेने चांगला प्रतिसाद दिला.  कार्यकर्त्यांवर लाठीमार झाला तो चुकीचा आहे.'

Updated: Jan 24, 2020, 04:57 PM IST
बंदमध्ये दगडफेक करणारे तोंड झाकून आले होते - प्रकाश आंबेडकर title=
संग्रहित छाया

मुंबई : आजच्या महाराष्ट्र बंदला जनतेने चांगला प्रतिसाद दिला. कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने कोणाला ही बंद करण्यास सांगितलेले नाही. अमरावतीला कार्यकर्त्यांवर लाठीमार झाला तो चुकीचा आहे. घाटकोपरमध्ये बसवर दगडफेक झाली त्या कार्यकर्त्यांनी तोंड झाकून हा प्रकार केला. तो आमचा कार्यकर्ता नाही, आम्ही तसे पोलिसांना कळवले आहे. आम्हाला द्यायचा होता तो संदेश दिला आहे, अशी माहिती वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

देशाची आर्थिक परिस्थिती ढासळते आहे. दिलेला बंदचा कॉल आम्ही चार वाजता मागे घेत आहोत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानत आहोत. देशात लागू केलेला एनआरसी, सीसीए या कायद्यांना विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र  बंद पुकारण्यात आला होता. मात्र या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. त्यामुळे या बंदला गालबोट लागले.

दरम्यान, दगडफेक करणारे आणि गाड्यांचे काचा फोडणारे चेहरा झाकून आले होते, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. महाराष्ट्रात हा बंद अगदी शांततेत पार पडला आहे. ज्या ठिकाणी हिंसा झाली आहे, त्याठिकाणी पोलीस प्रशासनाशी संवाद साधणार असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. बंद असलेली दुकाने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उघडली. त्यामुळे भाजप आणि वंचितचे कार्यकर्ते आमनेसामने आले, असेही ते म्हणाले.