दीपक भातुसे / मुंबई : वादग्रस्त MP मिल कम्पाऊंड SRA प्रकरणी निर्णय न घेतल्याचा मंत्री प्रकाश मेहतांचा दावा खोटा असल्याचे उघड होत आहे. बिल्डरला दिलेलं मंजुरीचं पत्र 'झी 24 तास'च्या हाती लागले आहे. मीडियात चर्चा झाल्यानंतर निर्णय रद्द झाल्याचे पत्रावरुन स्पष्ट होत आहे.
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी मंजूर केलेल्या ताडदेव येथील वादग्रस्त एम पी मिल कंपाऊंड एसआरए प्रकरणी महत्त्वाची माहिती झी मीडियाच्या हाती आली आहे. या प्रकरणात पुढील कार्यवाही झाली नव्हती, असा दावा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केला होता. मात्र हा दावा खोटा असल्याचं उघड झालंय.
याच प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मेहतांना वाचवण्याची मोठी कसरत केली. मात्र झी मीडियाच्या हाती आलेल्या कागदपत्रांनुसार या एसआरए प्रकल्पाला २३ जून २०१७ रोजी मंजूरी मिळाली होती. मात्र मिडियामधून हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय रद्द केला.
मुख्यमंत्र्यांनी निर्णय रद्द केल्यानंतर या प्रकरणातील बिल्डर एस. डी. कॉर्पोरेशनला एसआरएने हा निर्णय रद्द झाल्याचे पत्र १३ जुलै २०१७ रोजी पाठवले आहे. हे पत्रच झी मीडियाच्या हाती आले आहे. त्यामुळे प्रकाश मेहता यांच्या अडचणीत अधिक वाढ झालेय.