मुंबई : आपल्या खास शैलीतील ‘कॉमन मॅन’च्या माध्यमातून सर्वसामान्यांची दुखे: व्यक्त करत व्यवस्थेवर कोरडे ओढणारे जगप्रसिध्द व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची आज ९६ वी जयंती. जयंती निमित्त लक्ष्मण यांना जगभरातून श्रद्धांजली आर्पण करण्यात येत आहे.
आर. के. लक्ष्मण यांनी चितारलेल्या ‘कॉमन मॅन’ला जगभरातून प्रतिसाद मिळाला. देशातील अनेकांची सकाळ ‘कॉमन मॅन’च्या दर्शनाने होत असे. सर्वसामान्य मानसाच्या दबल्या आवाजाला आर. के. लक्ष्मण यांनी ‘कॉंमन मॅन’च्या माध्यमातून वाट करून दिली. ‘कॉमन मॅन’ चितरलेल्या या व्यंगचित्रकाराचा जन्म २४ ऑक्टोबर १९२४ रोजी म्हैसुर येथे अतिशय सुशिक्षित आणि समृध्द कुटूंबात झाला. लक्ष्मण यांचे पूर्ण नाव रासिपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण असे होते. त्यांचे वडील एका महाविद्यालयात प्राचार्य होते. तर मोठे बंधु आर.के नारायण प्रसिध्द लेखक. त्यांच्या बंधूंनीच लक्ष्मण यांच्यातील व्यंगचित्रकलेला प्रोत्साहन दिले.
लक्ष्मण यांना मुंबईतील सर जे.जे. कला माहाविद्यालयात व्यंगचित्रकलेसाठी प्रवेश नकारण्यात आला होता. त्यामुळे नाराज झालेल्या लक्ष्मण यांनी पुन्हा म्हैसुर गाठले व बी.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करून मुंबईत आल्यावर अनेक नावाजलेल्या वर्तमानपत्रांतून आपल्या व्यंगचित्रांची भुरळ वाचकांवर कायम ठेवली. त्यांना पद्मविभुषण, पद्मभुषण, रेमन मॅगॅसेसे आणि इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. आर.के नारायण यांच्या ‘मालगुडी डेज’ या पुस्तकासाठीही त्यांनी व्यंगचित्र काढली होती. ‘द सर्व्हंट्स ऑफ इंडिया’, हॉटेल रिवेरा या पुस्ताकांव्यतिरिक्त ‘द मेसेंजर’ व ‘द एलोक्युएंट ब्रश’ इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आत्मचरित्राचा 'लक्ष्मणरेषा' नावाने अनुवादही प्रसिद्ध झाला आहे.
लक्ष्मण यांनी आपल्या करिअरची सुरुवात 'द फ्री प्रेस जर्नल'पासून केली. त्या आधी ते हंगामी व्यंगचित्रकार म्हणून स्थानिक वृत्तपत्रात कार्टून काढत होते. राजकीय कार्टून काढण्यात ते माहीर होते. त्यांचा तो छंद होता. त्यांचे ‘कॉमन मॅन’हे व्यंगचित्र पात्र खूप गाजले. तेव्हापासून त्यांची 'कॉमन मॅन' म्हणून अधिक गणना होऊ लागली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय काराकीर्द सुरु होण्यापूर्वी आर. के. लक्ष्मण व बाळासाहेबांनी व्यंगचित्रकार म्हणून एकत्र काम केले होते. २६ जानेवारी २०१५ रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचे पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात त्यांचे निधन झाले. ५० वर्षांहून अधिक काळ महत्वाच्या वर्तमानपत्रात ते व्यंगचित्र काढत होते.