अंधेरी अपघातानंतर रेल्वेला जाग, ४४५ पुलांचं ऑडिट होणार

 मुंबईकरांसाठी मंगळवारची सकाळ चांगलीच दैना उडवून गेली.

Updated: Jul 3, 2018, 05:32 PM IST

मुंबई : मुंबईकरांसाठी मंगळवारची सकाळ चांगलीच दैना उडवून गेली. सकाळी सातच्या सुमारास अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पूल कोसळला. यानंतर आता रेल्वे मंत्रालयाला जाग आली आहे. मुंबईतल्या ४४५ पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. पुढच्या ६ महिन्यांमध्ये पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार असल्याचं गोयल म्हणाले. तसंच या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना १ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आजच्या दुर्घटनेबद्दल पियुष गोयल यांनी खेद व्यक्त केला आहे. रात्री ८ वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरु होईल, असं वक्तव्य गोयल यांनी केलं. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून याचा रिपोर्ट १५ दिवसात येईल, असं गोयल यांनी सांगितलं.

मोटरमनचा गौरव करणार

मोटरमन चंद्रशेखर सावंत यांचा गौरव करण्यात येणार असून त्यांना ५ लाख रुपयांचं इनाम देण्यात येणार असल्याची माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिली. मोटरमन चंद्रशेखर सावंत यांच्या प्रसंगावधानामुळे ही दुर्घटना टळली. सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी बोरिवलीवरून सुटणारी लोकल होती. पूल कोसळत असताना पाहताच मोटरमननं लोकल थांबवली. मोटरमन सावंत यांनी आर्मीमध्ये सेवा केली आहे. मोटरमननं प्रसंगावधान दाखवून गाडी थांबवल्यामुळं मोठी जीवितहानी टळल्याचं पोलसांनी म्हटलंय.

सहा जण जखमी

अंधेरीतल्या पूल दुर्घटनेत आत्तापर्यंत सहा जण जखमी झाल्याचं समोर येतोय... यात २ जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे... तर तीन जणांना फ्रॅक्चर झालंय. एकूण चार पुरुष आणि एक महिला यात जखमी झाले आहेत... द्वारकाप्रसाद शर्मा, मनोज मेहता, हरिश कोहाटे, गिंधम सिंघ अशी जखमी झालेल्या पुरुषांची नावं आहेत... तर एक महिला जखमी आहे.