आज आंबा विषय नको, त्यांची आपत्ती माझ्यावर नको - राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संभाजी भिडे अर्थात भिडे गुरुजी यांना जोरदार चिमटा काढला.  

Updated: Jun 13, 2018, 11:19 PM IST
आज आंबा विषय नको, त्यांची आपत्ती माझ्यावर नको - राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संभाजी भिडे अर्थात भिडे गुरुजी यांना जोरदार चिमटा काढला. राज ठाकरे यांनी त्यांच्या आजच्या व्यंगचित्रावरही भाष्य केले. ते म्हणाले व्यंगचित्रात एक बाळ दाखवले आहे. त्याचा चेहरा आंब्याचा दाखवला आहे. ते पाहून एक बाई म्हणतात, 'अय्या... भिडेंच्या बागेतून वाटतं...' ( जोरदार हशा ) आपत्यांची आपत्ती माझ्यावर नको. राज म्हणालेत, मोहर जळलेला असतो तर आंबा कुठून येतो. आज आंबा विषय नको. त्यांची आपत्ती मला नको असे म्हणत त्यांनी भिडे गुरुजी आणि आंबा विषयाला भाषणात पूर्णविराम दिला. 

९८ व्या  अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं मुंबईतल्या मुलुंडच्या कालिदास कलामंदिरात ज्येष्ठ रंगमंच कामगार उल्हास सुर्वे यांच्या हस्ते तिसरी घंटा वाजवून उदघाटन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज यांनी नाट्यक्षेत्रातील अपप्रवृत्तींवर बोट ठेवले. नाट्यक्षेत्र ही मोठी जबाबदारी आहे. मराठी माणसाला नाटकाचे वेड आहे. नाटकं खूप यावीत, पण ती चालतायत किती? चुकीच्या गोष्टी शिरल्या आहेत, त्या नष्ट करणे गरजेच आहे. काहीजण तारखा विकण्यासाठी या क्षेत्रात आहेत.  नाटक करून पोट भरण्यापेक्षा तारखा विकून पोट भरताय, असे म्हणत राज यांनी नाट्यक्षेत्रात शिरलेल्या अपप्रवृत्तींवर बोट ठेवले. भव्य नाटक का दिसत नाही, संहिता नाही, लेखक नाही, चांगले लेखक कुठे गेले, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. भव्यता आणि संहिता एकत्र आल्या तर मराठी माणूस पुन्हा नाटकाकडे वळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नाट्यगृहातील बाथरूमपेक्षा गोष्ट चांगली असली पाहिजे. मराठी माणूस तिकिटाकडे बघत नाही. आहे त्या पैशात काही मिळत का ते तो बघतो, असेही राज पुढे म्हणाले.