लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांचे लाईटबील माफ करावे - आठवले

सर्व गरिबांचे तीन महिन्यांचे लाईटबील शासनाने माफ करावे अशी मागणी

Updated: Apr 4, 2020, 06:29 PM IST
लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांचे लाईटबील माफ करावे - आठवले

मुंबई : लॉकडाऊनचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. गरिब, गरजूंसाठी केंद्राने अनेक योजना देखील जाहीर केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी नऊ मिनिटं वीज बंद ठेवण्याचे आवाहन केले. दरम्यान सर्व गरिबांचे तीन महिन्यांचे लाईटबील शासनाने माफ करावे अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. सर्व बिल माफ करता येत नसेल तर किमान ५० टक्के वीजबिलाची रक्कम माफ करावी अशी मागणी आठवले यांनी केली आहे. 

५० टक्के वीजबिल माफ करण्यासाठी त्यातील अर्धी वीज बिलाची रक्कम म्हणजे २५ टक्के बिल वीज कंपनी ने माफ करावे. तसेच पुढचे ४ महिने  थकबाकीमुळे कोणाचाही विज मीटर कापू नये अशी सूचना देखील आठवलेंनी विजकंपन्यांना केली आहे. 

मुंबई शहरात वीज पुरवठा बेस्ट करीत असून मुंबई महापालिके ने स्थायी समिती मध्ये याबाबत ठराव करून 3 महिने वीजबिल किमान 50 टक्के माफ करण्यासाठी निर्णय घ्यावा असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.

कोरोना चाचणी बद्दल देखील त्यांनी यावेळी भाष्य केले. सध्या कोरोना चाचणीसाठी ५ हजारापर्यंत दर आकारले जात आहेत. त्याऐवजी मोफत किंवा  ५०० रुपये इतकेच शुल्क आकारले जावे अशी मागणी ते मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. 

रुग्णालयातील डॉक्टरप्रमाणे नर्सेसनाही कोरोनाचे किट तसेच पुरेश्या सुविधा दिल्या पाहिजेत अशी मागणी आठवलेंनी केली आहे.