रेशनकार्ड नसेल तर आधारकार्ड ग्राह्य धरून मोफत धान्य द्या : देवेंद्र फडणवीस

कोणत्याही रंगाचे रेशनकार्ड असले तरी त्यांना धान्य उपलब्ध होणार ...

Updated: Apr 4, 2020, 05:25 PM IST
रेशनकार्ड नसेल तर आधारकार्ड ग्राह्य धरून मोफत धान्य द्या : देवेंद्र फडणवीस title=

मुंबई : ज्या लोकांकडे रेशनकार्ड नाही अशा व्यक्तींना आधारकार्ड प्रमाण मानून आणि ज्यांच्याकडे आधारकार्ड ही नाही अशा लोकांची यादी तयार करून, ती तहसिलदारांकडून प्रमाणित करून त्यांनाही धान्य द्या. या कालावधीत एकही व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, अशी विनंती माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, 'केंद्र सरकारने राज्याला अन्नधान्याचा साठा उपलब्ध करून दिला आहे. साधारणत: राज्यात 9 कोटी लोकं हे रेशनमधून धान्य घेत असतात. तीन महिन्यांचे धान्य मिळून 22 लाख मेट्रीक टन इतका साठा लागतो. त्यापैकी 20 लाख मेट्रीक टन धान्यसाठा हा राज्याला प्राप्त झाला आहे. हे अन्नधान्य कोणत्याही योजनेच्या व्यतिरिक्त आहे. ते पूर्णत: मोफत असून, त्याच्या वितरणाचा खर्च सुद्धा केंद्र सरकार देणार आहे. त्यामुळे कोणत्याही रंगाचे रेशनकार्ड असले तरी त्यांना धान्य उपलब्ध होणार आहे. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्यांचे आधारकार्ड गृहित धरा आणि ज्यांच्याकडे तेही नाही, अशांची यादी तयार करून ती तहसिलदारांकडून प्रमाणित करून त्यांनाही धान्य उपलब्ध करून देण्याची आज नितांत गरज आहे.'

या कालावधीत जनतेची गैरसोय होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. महिलांच्या जनधन खात्यात पैसा जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यात येत आहे. 80 कोटी लोकांना मोफत धान्य आणि 8 कोटी कुटुंबांना मोफत गॅस अशा अनेक बाबतीत प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे. कालच केंद्र सरकारने सर्व राज्यांना कोरोनाच्या संकटाचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी 17 हजार कोटी रूपये उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. 

कार्यकर्ते ठिकठिकाणी स्वत:ला झोकून देऊन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अन्न पुरवित आहेत, जवळजवळ 5000 युनिट्स रक्त रक्तदानातून उपलब्ध करून देण्यात आले आहे, मास्क, सॅनेटायझर वितरण सुद्धा होते आहे. ही गती अशीच कायम ठेवा, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केलं आहे.