Rashmi Thackeray Shivsena : ठाकरेंच्या 'मातोश्री' (Matoshree) जवळच्या कलानगर जंक्शन शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याचं (Dussehra Melava) पोस्टर लावण्यात आलं आहे. या पोस्टरवर चक्क रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचा फोटो आहे. शिवसेनेच्या पोस्टरवर पहिल्यांदाच रश्मी ठाकरे झळकल्यात. उद्धव (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यामध्ये रश्मी ठाकरे यांचा फोटो लक्ष वेधून घेतोय. 'काळ कसोटीचा आहे, पण काळाला सांगा, हा वारसा संघर्षाचा आहे' असा उल्लेख शिवसेनेच्या या पोस्टरवर करण्यात आला आहे. आणि याच कसोटीच्या काळात रश्मी ठाकरेंना प्रत्यक्ष मैदानात उतरवण्याची रणनीती शिवसेनेनं आखलेली दिसतेय.
एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) बंडानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्वच धोक्यात आलंय. धनुष्य बाण हे निवडणूक चिन्हही राहते की जाते, अशी परिस्थिती आहे. अशा बिकट काळात रश्मी ठाकरे शिवसेनेत आता सक्रीय झाल्यात, हेच या पोस्टरवरून स्पष्ट दिसतंय.
रश्मी ठाकरे मैदानात
रश्मी ठाकरेंनी पहिली चाल केलीय तीच शिंदेंच्या बालेकिल्ल्यात. महिनाभरात दोनवेळा त्यांनी ठाण्यात धडक दिली. पहिल्यांदा रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत मंगळागौरीचा कार्यक्रम पार पडला. आता दिघेंच्या देवीच्या दर्शनाच्या निमित्तानं त्यांनी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एण्ट्री केली. रश्मी ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या टेंभी नाका इथल्या देवीचं दर्शन घेतलं. रश्मी ठाकरेंच्या ठाणेवारीमुळं शिवसैनिकांमधला उत्साह वाढलाय.
गेल्या आठवड्यात गोरेगावच्या नेस्को मैदानात शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा झाला, त्यावेळी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे (Tejas Thacekray) यांचा खास उल्लेख करून सत्कार करण्यात आला. याचाच अर्थ येणाऱ्या काळात रश्मी ठाकरे आणि त्यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हे शिवसेनेच्या राजकारणात सक्रीय होणार असल्याचं मानलं जातंय. शिवसेनेच्या संघर्षाच्या काळात दो से भले तीन नव्हे, तर दो से भले चार ठाकरे पक्ष वाचवण्यासाठी रणमैदानात उतरलेत.