परप्रांतीय कामगारांची वापसी; पोलिसांकडून नोंदणी सुरु, राज्यात आतापर्यंत इतके आलेत कामगार

परप्रांतीय कामगार कामावर परतू लागले आहेत. परराज्यात गेलेले कामगारही राज्यात पुन्हा परत येत आहेत. 

Updated: Jun 19, 2020, 06:32 AM IST
परप्रांतीय कामगारांची वापसी; पोलिसांकडून नोंदणी सुरु, राज्यात आतापर्यंत इतके आलेत कामगार  title=
संग्रहित छाया

मुंबई : लॉकडाऊनच्या शिथिलीकरणानंतर आता राज्यात विविध उद्योगधंदे हळू हळू सुरु झाले आहेत. त्यामुळे कामगार कामावर परतू लागले आहेत. परराज्यात गेलेले कामगारही राज्यात पुन्हा परत येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात परत येणाऱ्या सर्व कामगारांची नोंद, थर्मल तपासणी आणि होम क्वॉरंटाईन करण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगार वर्ग हा आपआपल्या राज्यात परत गेला होता. तो आता महाराष्ट्रात मोठ्या संख्येने परत येत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगडसह राज्याच्या इतर भागातही दररोज जवळपास १५.५० हजार कामगार येत आहेत. यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या सर्व कामगारांची यादी संबंधित राज्यांकडून आपल्याकडे पाठवण्यात येते. त्या यादीनुसार आलेल्या सर्व कामगारांची नोंद, तसेच त्यांची थर्मल तपासणी करण्यात येते व त्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाईन शिक्का मारून त्यांना राहण्याच्या ठिकाणी होम क्वॉरंटाईनसाठी पाठवण्यात येते. मुंबईमध्ये बेस्टमार्फत पाठवण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यातील गोंदिया, नंदुरबार, कोल्हापूर, नागपूर, पुणे या ठिकाणी सध्या साधारणतः ४ ते ५ हजार तर मुंबई ठाणे नवी मुंबई भागात ११ ते  ११.५० हजार परप्रांतीय कामगार दररोज येत आहेत. सध्या मर्यादित रेल्वे सुरु असल्याने ही संख्या कमी आहे, पण आपल्याकडील उद्योगधंदे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर या संख्येत निश्चितच वाढ होईल. त्यावेळी देखील योग्य ती खबरदारी घेण्यात येईल असे देशमुख यांनी स्पष्ट केले.