सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर ड्रग्ज प्रकरणात ऋषीकेश पवारला अटक

 ऋषीकेश चेंबूर इथं राहतो मात्र काही दिवसांपासून तो फरार होता.

Updated: Feb 2, 2021, 12:45 PM IST
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर ड्रग्ज प्रकरणात ऋषीकेश पवारला अटक title=

मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर ड्रग्ज प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. ऋषीकेश पवार नावाच्या सुशांतच्या असिस्टंट डायरेक्टरला अटक करण्यात आली आहे. ऋषीकेश पवारला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आलं होतं मात्र तो फरार झाला होता. ऋषीकेश चेंबूर इथं राहतो मात्र काही दिवसांपासून तो फरार होता. एनसीबी अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी धाडही टाकली होती. त्यावेळी त्याच्या घरातील लॅपटॉपमध्ये महत्वाची माहिती मिळाली होती. त्याची हार्ड डिस्क एनसीबी अधिकाऱ्यांनी जप्त केली होती. 

ऋषीकेशविरोधात अनेक पुरावे एनसीबी अधिकाऱ्याकडे उपलब्ध आहेत. अटक टाळण्यासाठी ऋषीकेश पवारनं सेशन कोर्टात धाव घेतली होती. मात्र, सेशन कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला. यानंतर त्याला पुन्हा चौकशीसाठी समन्स केलं असता आता तो उपलब्ध होत नव्हता. एनसीबी अधिकारी त्याचा शोध घेत होते. अखेर त्याला अटक करण्यात आलीय. 

सुशांतचे अनेक ड्रीम प्रोजेक्ट होते. त्या प्रोजेक्टवर ऋषीकेश मॅनेजर म्हणून काम करत होता. ऋषीकेश पवारला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.

सुशांतसिंह राजपूतचा मृतदेह 14 जून 2020 रोजी मुंबईच्या वांद्रे येथील त्याच्या फ्लॅटमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यांच्या निधनानंतर सीबीआय, ईडी, एनसीबी, मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला, पण अभिनेत्याच्या मृत्यूमागील खरं कारण काय आहे याबाबत अंतिम निर्णय पुढे आलेला नाही. या प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिला महिनाभरासाठी तुरूंगात देखील राहावे लागले. तिचा भाऊही 3 महिने तुरुंगात होता.

यानंतर बॉलिवूडमधील ड्रग्जचे मोठे रॅकेट उघडकीस आले. दीपिका पादुकोण यांच्यासह अनेक अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली. अभिनेता अर्जुन रामपालचंही नाव पुढे आलं. 30 पेक्षा जास्त ड्रग्ज पॅडलरना आतापर्यंत अटक केली गेली आहे. एनसीबी अद्याप या प्रकरणाचा तपास करत आहे.