डॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठला निच्चांक; जाणून घ्या तुमच्या खिशावर काय होणार परिणाम

परदेशी गुंतवणूकदारांची सततची माघार आणि देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणीमुळे रुपया विक्रमी पातळीवर गेला आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया नीचांकी पातळीवर आला आहे.

Updated: Jun 23, 2022, 10:26 AM IST
डॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठला निच्चांक; जाणून घ्या तुमच्या खिशावर काय होणार परिणाम title=

मुंबई : Rupee Slumps All Time Low: विदेशी गुंतवणूकदारांची सततची माघार आणि देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणीमुळे रुपया विक्रमी पातळीवर गेला आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया नीचांकी पातळीवर आला आहे. बुधवारी रुपया 19 पैशांनी घसरून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 78.32 रुपये प्रति डॉलर या नवीन विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला. मात्र, गुरुवारी सकाळी त्यात सुधारणा दिसली आणि तो 78.24 रुपये प्रति डॉलरवर चालू आहे.

परदेशात डॉलरच्या मजबूतीमुळे रुपयाच्या भावावर परिणाम झाल्याचे विदेशी मुद्रा व्यापार्‍यांनी सांगितले. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने रुपयाचे नुकसान मर्यादित झाले. आंतरबँक परकीय चलन बाजारात, स्थानिक चलन डॉलरच्या तुलनेत 78.13 वर सपाटपणे उघडले. गुरुवारच्या व्यवहारादरम्यान तो 78.13 चा उच्च आणि 78.40 चा विक्रमी नीचांक होता.

बुधवारी 78.32 ची विक्रमी पातळी गाठली

रुपया अखेरीस 78.32 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला, मागील बंद किंमतीच्या तुलनेत 19 पैशांनी घसरला. मागील सत्रात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 78.13 वर बंद झाला होता.

फेड रिझर्व्हने व्याजदर वाढवल्याचा परिणाम

जतिन त्रिवेदी, उपाध्यक्ष, संशोधन विश्लेषक विभाग, LKP सिक्युरिटीज म्हणाले, "फेड रिझर्व्हच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेत केलेल्या आक्रमक विक्रीमुळे रुपया 78.30 च्या खाली घसरला."

तुमच्यावर होणार परिणाम?

रुपयाच्या विक्रमी नीचांकी पातळीवर गेल्याने त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. भारतीय चलनाच्या घसरणीचा सर्वात मोठा परिणाम आयातीवर होणार आहे. भारतात आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढतील. 

देशात 80 टक्के कच्चे तेल आयात केले जाते, म्हणजेच भारताला कच्च्या तेलासाठी जास्त किंमत मोजावी लागेल आणि परकीय चलन जास्त खर्च होईल. अशा परिस्थितीत तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात.