मुंबई : मुंबईच्या चेंबूर भागात एका रशियन महिलेवर बलात्कार झाल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस निरीक्षकाने वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा या महिलेने दाखल केला आहे. ही महिला २००४ मध्ये बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी व्हीसीट व्हिसावर आली होती. मात्र व्हीसाची मुदत संपल्यावर तिची गाठ पोलीस निरीक्षक अनिल जाधवशी पडली. अनिल जाधवने या महिलेचा बनावट पासपोर्ट बनवून दिला. त्यानंतर तो सातत्याने तिला धमकी देऊन बलात्कार करत होता असं त्या महिलेने आरोप केला आहे.
रशियन महिला तीन वेळा गर्भवतीही राहिली. दोन वेळा महिलेचा गर्भपात करण्यात आला. महिलेला आरोपीपासून झालेला एक पाच वर्षांचा मुलगाही आहे. पोलीस निरीक्षक अनिल जाधवचा याआधीच विवाह झाला आहे. तक्रारदार रशियन महिला आणि तिच्या मुलाला अनिल जाधवने मारण्याचाही प्रयत्न केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर अनिल जाधवला निलंबित करण्यात आलं आहे.