'सामना'च्या अग्रलेखातून भाजपाच्या मेगाभरतीला चिमटे

'कालिदास कोळंबकरांना शिवसेनाप्रमुखांविषयी इतकाच जिव्हाळा होता तर त्यांनी शिवसेनेची वाट धरायला हवी होती'

Updated: Aug 2, 2019, 10:53 AM IST
'सामना'च्या अग्रलेखातून भाजपाच्या मेगाभरतीला चिमटे title=

मुंबई : शिवसेनेच्या सामना या मुखपत्राच्या अग्रलेखात 'धर्मशाळेतून पक्क्या घरात' असं म्हणत भाजपाच्या मेगाभरतीला चिमटे काढण्यात आलेत. 'राजकारणात नीतिमत्ता शिल्लक आहे. मुख्यमंत्र्यांची त्यासाठी धडपड सुरू आहे. काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेतून बरेच लोक भाजपच्या पक्क्या घरात प्रवेश करीत आहेत. ते सर्व कर्तबगार, कार्यमग्न लोक आहेत. आधीच्या धर्मशाळेत त्यांचे कार्य व कर्तबगारीस कुणी विचारीत नव्हते. आता नव्या घरात त्यांच्या कर्तृत्वाची गुढी अधिक उंचावेल' असं म्हणत शेलक्या शब्दांत या मेगाभरतीवर भाष्य करण्यात आलंय. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'भारतीय जनता पक्ष म्हणजे काही धर्मशाळा नाही' असं म्हणतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या पक्षांतून जे लोक घेतले आहेत त्यांचे कार्य, कर्तृत्व आणि चारित्र्य चमकदार असल्याचं प्रमाणपत्र दिलं आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांवरही अग्रलेखातून निशाणा साधण्यात आलाय. 

'काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे पक्ष मधल्या काळात धर्मशाळाच झाल्या. त्या धर्मशाळेतील बरेच लोक भाजपच्या पक्क्या आणि कायमस्वरूपी घरात आले व मुख्यमंत्र्यांनी त्यांना घराच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम पार पाडला', असा टोलाही या अग्रलेखात हाणलाय. 

कोळंबकर हे शिवसेनेत आमदार व मंत्री होते. ते शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले व आता भाजपवासी झाले. शिवसेना सोडून मोठा कालखंड लोटला आहे. कोळंबकर विधानसभेची जी जागा लढवत आहेत ती ‘युती’मध्ये शिवसेनेच्या वाटय़ाला आहे. त्यांना शिवसेनाप्रमुखांविषयी इतकाच जिव्हाळा होता तर त्यांनी शिवसेनेची वाट धरायला हवी होती. त्यामुळे त्यांचे अश्रू कुणालाही विचलित करू शकत नाहीत, असं म्हणत नारायण राणे यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या कोळंबकरांवरही या अग्रलेखातून टीका करण्यात आलीय. 

'ईडी' वगैरेंची चौकशी चालू असलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश नाही, असे सांगून त्यांनी भुजबळांसारख्यांचा भाजप प्रवेशाचा दरवाजा दाणकन बंद केला, असा सूचक इशाराही या अग्रलेखातून देण्यात आलाय.