'मुख्यमंत्री असताना केलेल्या चुका विरोधी पक्षनेते असताना करू नका'

सामनामधून देवेंद्र फडणवीस यांना सल्ला

Updated: Dec 2, 2019, 08:21 AM IST
'मुख्यमंत्री असताना केलेल्या चुका विरोधी पक्षनेते असताना करू नका' title=

मुंबई : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ज्या चुका केल्या त्या निदान विरोधी पक्षनेते म्हणून तरी करु नयेत, असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे. विरोधी पक्षनेतेपदाची शान व प्रतिष्ठा राहावी, अशी आमची इच्छा आहे. खरं तर भाजपचा हा अंतर्गत मामला आहे की, कुणाला विरोधी पक्षनेते करायचे किंवा कुणाला आणखी काय करायचे, पण राजस्थानमध्ये भाजपने वसुंधराराजे शिंदेंना किंवा मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांना विरोधी पक्षनेते केलं नाही. महाराष्ट्रात मात्र दिल्लीवाले फडणवीस एके फडणवीस करत आहेत, यामागचं रहस्य समजून घ्यावं लागेल, असं सामनाच्या अग्रलेखात छापून आलं आहे.

बहुमताच्या आसपासही जाणं शक्य नसताना दिल्लीने फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली आणि ते सरकार कोसळल्यावर पुन्हा फडणवीस यांनाच विरोधी पक्षनेता केलं. महाराष्ट्राच्या जनेतला भाजपच्या राज्यस्तरीय नेतृत्वातही बदल हवा होता, त्याचं प्रतिबिंब मतदानात दिसलं, पण तरीही भाजप नेतृत्वाने फडणवीस यांनाच विरोधी पक्षनेतेपदी नेमलं. ही त्यांची पक्षांतर्गत बाब असल्यामुळे आम्ही फार काही बोलणार नाही, असं संजय राऊत सामनाच्या अग्रलेखात म्हणाले आहेत.

छत्रपती शिवरायांचं नाव मंत्र्यांनी शपथविधीमध्ये घेतलं म्हणून फडणवीस यांचा जळफळाट झाला. महाराष्ट्राला अंधारात ठेवून बेकायदेशीररित्या शपथ घेणारे मुख्यमंत्री विधानसभेला सामोरं न जाता ८० तासांचे मुख्यमंत्री अशी आपली इतिहासात नोंद झाली आहे हे लक्षात घ्या. ही नोंद पुसायची असेल तर विरोधी पक्षनेता म्हणून कायद्याने काम करा किंवा निदान खडसे मास्तरांची पक्षांतर्गत शिकवणी लावा, असा सल्लाही फडणवीस यांना देण्यात आला आहे.

भाजपने बहुजन समाजाचा चेहरा गमावला आहे आणि जनता त्यांच्यापासून दूर गेली आहे. आज विरोधी पक्ष म्हणून जो आकडा त्यांच्याभोवती दिसत आहे, तो टिकवणंही यापुढे अवघड जाईल, असं वातावरण आहे. १७०चं बहुमत साधं नाही आणि उद्या हा आकडा १८५ पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको, असं सूचक वक्तव्य सामनामधून करण्यात आलं आहे.