वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सचिन वाझे यांची अखेर बदली

मनसुख हिरेन प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांची भाजपच्या (BJP) तीव्र विरोधानंतर बदली करण्यात आली आहे. 

Updated: Mar 12, 2021, 02:14 PM IST
वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सचिन वाझे यांची अखेर बदली  title=

मुंबई : मनसुख हिरेन प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांची भाजपच्या (BJP) तीव्र विरोधानंतर बदली करण्यात आली आहे. वाझे यांच्या बदलीचे आदेश मुंबई पोलीस (Mumbai Police) मुख्यालयातून अधिकृत आदेश काढण्यात आले आहेत.  सचिन वाझे हे मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख होते. मनसुख हिरेन प्रकरणानंतर भाजपने त्यांना अटक करण्याची थेट मागणी केली होती.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडली. याचा तपास सचिन वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला. जी गाडी सापडली त्या गाडीचा मालक हा ठाण्यातील असल्याचे पुढे आले. त्यानंतर मनसुख  हिरेंन यांचा मृत्यू झाला आणि वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानात विरोधी पक्षाने त्यांचे निलंबन करुन अटकेची मागणी लाऊन धरली. अखेर गृहमंत्र्यांनी हा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविला. 

त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची बदली करण्याचे आदेश दिले. तेव्हापासून सचिन वाझे यांची बदली आता कोणत्या विभागात होणार, याकडे लक्ष लागले होते. मात्र गुरुवारी शासकीय सुट्टी असल्याने वाझे यांची बदली करण्यात आली नाही. त्यानंतर मात्र आता वाझे यांची मुंबई पोलीस आयुक्तालयातील नागरी सुविधा केंद्र विभागात बदली करण्यात आली आहे.

 मुंबई क्राईम ब्रांचचे सचिन वाझे यांच्यावर  हिरेन प्रकरणी आरोप करण्यात आले. हिरेन यांची हत्‍या झाल्‍याचा आरोप त्‍यांच्‍या पत्‍नी विमला हिरेन  यांनी केला होता. यानंतर वाझे संशयाचा भोवर्‍यात सापडले. हिरेन यांच्‍या मृत्यूचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आल्‍याचे सरकारने जाहीर केले.