मुंबई : मनसुख हिरेन आणि अँटिलिया प्रकरणात आरोपी सचिन वाझे यांना मंगळवारी पोलीस सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. ते मुंबई पोलिसात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून तैनात होते.
मुंबईत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही सापडली होती. त्यानंतर ही गाडी ज्यांची होती. त्या मनसुख हिरेनची रहस्यमयपणे हत्या करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) या दोन्ही प्रकरणांची चौकशी सुरु केली. सचिन वाझे यांना आरोपी म्हणून अटक केली. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी निलंबित केले आहे.
मुंबई पोलिसांनी सांगितले की, पोलीस आयुक्त हेमंत नांगराळे यांच्या आदेशानुसार सचिन वाझे यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. एका उच्च अधिकाऱ्यांने सांगितले की, "एपीआय सचिव हिंदुराव वाजे यांना पोलीस सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांनी भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीतील 311 (2) (बी) अन्वये यासंदर्भात आदेश जारी केला आहे.
1990 च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी सचिन वाझे यांना 'एन्काऊंटर कॉप' म्हणूनही ओळखले जात असे. कोठडीत असलेल्या एका आरोपीच्या मृत्यूप्रकरणी त्यांना 16 वर्षे निलंबित केल्यानंतर जून 2020 मध्ये त्यांना पुन्हा नोकरी देण्यात आली. यानंतर, ते गुन्हे युनिटचे (सीआययू) प्रमुख म्हणून तैनात होते.
नियुक्ती झाल्यापासून बनावट टीआरपी, बनावट सोशल मीडिया फॉलोअर्स, डीसी कार फायनान्स घोटाळा आणि अंबानी सुरक्षा प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या / हायप्रोफाईल प्रकरणांवर सचिन वाजे तपास करीत होते. यानंतर एसयूव्ही आणि मनसुख हिरेन प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांना 13 मार्च 2021 पासून निलंबित करण्यात आले.
दुसरीकडे, महाराष्ट्र पोलिसांनी मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरूद्ध तपास सुरू केला आहे. राज्य पोलिसांच्या सीआयडीने परमबीर सिंग यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी फिर्यादी सोनू जालान याला समन्स बजावले आहे. त्यांनी तक्रारदाराला बेलापूरमधील सीआयडी कार्यालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
ठाणे पोलीस परमबीर सिंग यांच्या विरोधातील आरोपाचा तपास करत आहेत. जिल्ह्याच्या डीसीपींनी सोनू जालान व अन्य व्यावसायिकांना पोलीस तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे.
माजी गृहमंत्र्यांवर खंडणीचा आरोप
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्यामार्फत मुंबईतून 100 कोटी रुपयाचे हप्ता जमा करण्यास सांगितल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही अर्ज दाखल केला, त्यानंतर कोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांची चौकशी सुरु आहे.
राज्य सरकारने यानंतर परमबीर सिंग यांच्या विरोधात चौकशी सुरू केली आहे. मूळचे फरिदाबाद जिल्ह्यातील असलेले परमबीर सिंग सध्या महाराष्ट्रात डीजी पदावर कार्यरत आहे.