मुंबई : परमबीर सिंग (Parambir Singh Letter) यांनी खरंच ते पत्र लिहिले आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यांना कोणीतरी लिहून दिले आणि त्यांनी ते दिले, असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी म्हटले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या चौकशीसंदर्भात प्रतिक्रिया देताना ही त्यांनी शंका व्यक्त केली. त्याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मोठे नेते असावेत, असा टोला राऊत यांनी यावेळी लगावला.
अनिल देशमुख यांच्या चौकशीसंदर्भात निवृत्त न्यायाधीशांची चौकशी नेमली तर राजीनाम्याची गरज नसते, असे संजय राऊत म्हणाले. भाजपचे नेते राज्यपालांना भेटतात मग 12 आमदारांच्या शिफारसीचं का विचारत नाहीत? राज्याच्या जनतेच्या मनात राज्यपालांबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे, असे राऊत म्हणाले. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस मोदींपेक्षा मोठे नेते असावेत, असा टोला लगावला.
अनिल देशमुख हे पहिल्या दिवसापासून चौकशी करा, असे सांगत आहेत. चौकशीला कोणाचाही नकार नव्हता. मुख्यमंत्री, अनिल देशमुख, आम्ही चौकशी करा म्हणत होतो, फक्त विरोधी पक्षनेते म्हणतात चौकशी नको आधी फाशी द्या, अशी टीका त्यांनी केली. वारंवार राजीनाम्याची आणि सरकार बरखास्त करण्याची मागणी यामुळे विरोधी पक्षाचं हसे झाले आहे. लोक त्यांना मूर्खात काढतात हे समजले पाहिजे. आमच्यासाठी हा विषय संपला असून यावर आता जास्त चर्चा होता कामा नये. यामध्ये विशेष घडामोडी घडतील असं वाटत नाही, असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले.
भाजपचे नेते राज्यपालांना भेटतात मात्र, 12 आमदारांच्या शिफारसीचं का विचारत नाहीत? राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी पाठवून सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला. त्याबद्दल काय झाले याचा खुलासा होणे गरजेचे आहे. अभ्यास करत आहेत वैगेरे ठीक आहे, त्यातून त्यांना काही पीएचडी करायची आहे का? जी नावे पाठवली आहेत ती जास्तीत जास्त काळ आपल्या मांडीखाली कशी दाबून ठेवता येतील यासंदर्भात एखादा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड करायचा आहे का असा प्रश्न आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
दरम्यान, 'परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाबाबत आपली चौकशी करा', अशी मागणी वर्षावरील मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. त्यासाठी आता राज्य सरकार चौकशी आयोग नेमणार आहे, अशी माहिती स्वत: गृहमंत्री देशमुख यांनी दिली. निवारी परमबीर सिंग यांनी पत्र लिहून आरोप केल्यानंतरही अनिल देशमुख यांनी ही मागणी केली. अखेर चौकशी आयोग नेमण्याचा निर्णय झाला आहे.