शाह-ठाकरे भेटीनंतर 'युती'बद्दल संजय राऊत म्हणतात...

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 

Updated: Jun 7, 2018, 11:56 AM IST

 

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली. अनेक गोष्टींवर या भेटीदरम्यान चर्चा झाली. या भेटीमुळे शिवसेना- भाजपामधील दुरावा कमी होणार का? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले होते. 

संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया 

2019 साठी युती होईलच, असं भाजपतर्फे सांगण्यात येत असलं तरी शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्षाचे प्रमुख उद्धव यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा ठराव मंजुर केला आहे. तो अन्य कोणत्याही पक्षाला बदलता येणार नाही, असं शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे. स्वबळावर निवडणुका ठरवण्याच्या भूमिकेवर शिवसेना ठाम असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

ठाकरे - शाह भेट

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली. पुढील वर्षी होणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची भेट होत असल्याने प्रसारमाध्यमांमध्ये या भेटीविषयी प्रचंड उत्सुकता होती. सायंकाळी पावणे आठच्या दरम्यान अमित शाह मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस हे देखील अमित शाह यांच्यासोबत होते. या भेटीनंतर लोकसभेसाठी शिवसेना-भाजप युती नक्की करु, असे शिवसेनेने भाजपला आश्वासन दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण, संजय राऊतांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर या केवळ चर्चाच असल्याचं दिसतंय.