मुंबई : बँकेच्या खात्यात किमान रक्कम ठेवण्याच्या बंधनामुळे बँकांच्या कमाईत घसघशीत वाढ झालीय.
भारतातली सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियानं गेल्या आठ महिन्यांत किमान रक्कम न ठेवणा-या ग्राहकांवर केलेल्या दंडात्मक कारवाईतून तब्बल 1 हजार 771 कोटी रुपयांची कमाई केलीय. ही रक्कम बँकेच्या पहिल्या तिमाहीतल्या नफ्यापेक्षाही जास्त आहे. एसबीआयनं दुस-या तिमाहित म्हणजे जुलै ते सप्टेंबरमध्ये 1 हजार 581 कोटी नफा कमवला.
मात्र त्यापेक्षाही जास्त कमाई एसबीआयनं दंडात्मक कारवाईतून केल्याचं केंद्रीय अर्थखात्यानं दिलेल्या माहितीतून पुढं आलंय. एसबीआयचे देशात 42 कोटी ग्राहक आहेत. यात 13 कोटी बचत खाते आणि प्रधानमंत्री जन धन योजनेच्या ग्राहकांचा समावेश आहे. मात्र या दोन्ही खातेदारांना किमान रक्कम ठेवण्याच्या बंधनातून सूट देण्यात आली आहे.